Solapur, 25 November : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी उतरलेल्या 184 उमेदवारांपैकी तब्बल 159 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यामध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांच्यासह सोलापूर दक्षिणमधील बडे नेते धर्मराज काडादी, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांचाही समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीत भल्याभल्यांना जमिनीवर आणण्याचे काम जनतेने केल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर जिल्ह्यात (Solapur) 184 उमेदवार अकरा विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावत होते. भारतीय जनता पक्षाचे पाच उमेदवार निवडून आले असून महाविकास आघाडीचे सहा उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील तब्बल 159 उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवता आलेले नाही.
विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Election) उतरलेल्या सोलापुरातील 184 उमेदवारांपैकी 159 उमेदवारांना एकूण वैध मतांच्या एक षष्टमांश मते मिळवता आलेली नाहीत. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या 159 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यातून सरकारला तब्बल 12 लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे.
डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांचाही समावेश आहे. तसेच, याच मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनाही आपली अनामत वाचवता आलेली नाही.
सोलापूर दक्षिण मतदार संघातून विधानसभा निवडणुकीत प्रथमच नशीब आजमावणारे सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनाही या निवडणुकीत जबरदस्त धक्का बसला आहे. या निवडणुकीत काडादी यांना एकूण वैध मतांच्या एक षष्टमांश मते मिळवता न आल्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे, त्यामुळे काडादी, चेतन नरोटे आणि माजी आमदार नरसय्या आडम यांना जप्ती जप्तीचा फटका बसला आहे.
नोटाला तब्बल दहा हजार मते
दरम्यान, जिल्ह्यातील ११ मतदारसंघात तब्बल 9 हजार 896 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे. सांगोला मतदार संघात नोटाला सर्वाधिक 1106 मते पडली आहेत. नोटाला सर्वात कमी मते ही सोलापूर शहर मध्ये मतदार संघातून मिळाली आहे. या मतदारसंघातील सर्व उमेदवारांना नाकारून 557 मतदारांनी नोटाला मतदान केल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.