

Satara, 13 November : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मतदारसंघ असलेल्या माण-खटावमध्ये शिवसेने लक्ष घातले आहे. पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न आणि पाणी टंचाईची समस्या जाणून घेतली. काही प्रश्नांची त्यांनी तत्काळ सोडवणूक केली तर अतिरिक्त पाण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यामुळे आगामी काळात गोरेंच्या मतदारसंघात शिवसेनेचा वावर वाढण्याची शक्यता आहे. कारण गोरेंचे बंधू शेखर गोरे यांचीही माण खटाव हीच कर्मभूमी आहे.
उत्तर माण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पाणीटंचाईच्या प्रश्नांची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांशी फोनद्वारे थेट संवाद साधला.
या वेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या आणि व्यथा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या समोर मांडल्या. शेतकऱ्यांच्या समस्या तत्काळ समजून घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी संपर्क साधून उत्तर माणमधील शेतकऱ्यांना अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक निर्देश दिले.
उत्तर माणमधील बिजवडी, मोगराळे, राजवडी, जाधववाडी तोंडले, येळेवाडी, पाचवड, हस्तनपूर, अनभुलेवाडी, परकंदी, वारुगड, दानवलेवाडी, डंगीरवाडी, वावरहिरे,मोहीसह एकूण १५ गावांचा समावेश करण्याबाबत अक्षयमहाराज भोसले यांनी विनंती केली.
शेतकऱ्यांनी चारा छावणी सुरू करण्याचा प्रश्न उपस्थित केला असता, या मागणीची सकारात्मक दखल घेत संबंधित यंत्रणेला प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वेक्षण करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले आहेत.
याबाबत शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अत्यंत संवेदनशील आहेत. शेतकऱ्यांची व्यथा समजून घेऊन ते केवळ आश्वासन देत नाहीत, तर तत्काळ कृती करतात. टँकरची संख्या वाढविण्यापासून पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यापर्यंत निश्चितच सकारात्मक निर्णय होतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.
शिवसेना पक्षाच्या स्तरावरूनही आवश्यक मदत उपलब्ध होण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. त्यांच्या संवादानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने संपर्क साधून उत्तर माणच्या गावांच्या विकास कामांबाबत कार्यवाही सुरू केल्याचेही अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.