

Sanjay Kenekar: छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील शहागंज भागात केलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. महापालिकेने अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एमआयएमच्या नगरसेवकांनी या भागात जाऊन फळ विक्रेत्यांना पुन्हा गाड्या लावायला लावल्या. अतिक्रमण हटाव पथक, अधिकाऱ्यांना तिथून हुसकावून लावले. या प्रकरणी विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांच्यासह एमआयएमच्या 11 नगरसेवकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
या वादात भाजपाचे आमदार संजय केणेकर यांनीही उडी घेतली आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेचं देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली कायद्याचं राज्य आहे. त्यामुळे जो कोणी कायदा मोडेल, त्याचं आम्ही कंबरडं मोडू, असा इशारा केणेकर यांनी दिला. अतिक्रमणाच्या आड कोणताही लोकप्रतिनिधी, नगरसेवक येत असेल तर त्याला पदावरून हटवून घरी बसवा, असे थेट सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. त्यामुळे एमआयएमच्या ज्या नगरसेवकांनी महापालिकेच्या कारवाई अडथळा आणला, त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करून त्यांना घरी बसवले जाऊ शकते, असा इशाराही केनेकर यांनी दिला. चार दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज भागात एका गर्भवती महिलेसह तिचा पती आणि दिराला अतिक्रमण करत फळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी बेदम मारहाण केली होती.
त्यानंतर या भागात महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने धडक कारवाई करत बुलडोझर फिरवला होता. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण देत शिवसेना-एमआयएम आमने सामने आले आहेत. अतिक्रम हटाव कारवाईत अडथळा आणणाऱ्या एमआयएमच्या नगसेवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांचे नगरसेवक पद रद्द करा, अशी मागणीही होऊ लागली आहे. या वादावर भाजपानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमदार संजय केनेकर यांनी महापालिका प्रशासनाने एमआयएमच्या नगरसेवकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचे समर्थन केले. तसेच कायदा मोडणारा मग तो कोणत्याही जाती, धर्माचा किंवा पक्षाचा असो, त्यांचे कंबरडे मोडण्याचे काम कायद्याने केले जाईल, असे केनेकर यांनी सांगितले. एमआयएमकडून अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते.
फळ विक्रेत्यांकडून या पक्षाचे काही लोक, नेते हप्ते घेतात असा गंभीर आरोपही केणेकर यांनी केला आहे. हे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाही. महापालिकेत तुमच्या पक्षाला यश मिळाले म्हणून तुम्ही काही कराल आणि आम्ही शांत बसू असे कदापी होणार नाही. कायदा सगळ्यांसाठी समान आहे, त्यानुसारच महापालिका प्रशासनाने एमआयएमच्या नगरसेवकांवर कारवाई केली आहे, असेही केणेकर म्हणाले.
दुसरीकडे एमआयएम पक्ष महापालिका प्रशासनाच्या तक्रारीवरून दाखल केलेल्या गुन्ह्यांविरोधात कोर्टात जाणार असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी आपण या गु्न्ह्यात जामीन देखील घेणार नाही, पोलिसांनी आपल्याला अटक करावी अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. विशिष्ट समाजाला टार्गेट करत महापालिकेच्या पथकाने शिवसेनेच्या नगरसवेकाच्या दबावात शहागंजमध्ये कारवाई केल्याचा आरोपही एमआयएमने केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.