-रुपेश कदम
Satara Political : राज्याच्या काही भागांत दर दोन वर्षांनी विविध कारणांनी निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाकांक्षी 'जलयुक्त शिवार' अभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. या नावीन्यपूर्ण योजनेनुसार जलसंधारणांतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनाद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे.
मात्र सातारा जिल्ह्यातील माण - खटावमधील लघुपाटबंधारे विभागाकडून या महत्त्वाकांक्षी योजनेला 'खोडा' घालण्याचे काम केले आहे. त्यामुळे निविदा रद्द केल्याने दहा कोटींच्या कामांना 'खो' बसला आहे. लघुपाटबंधारे विभागाकडून तांत्रिक कारण पुढे करून माणमधील 36 व खटावमधील 13 निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.
साधारण 9 ते 10 कोटी रुपयांच्या निविदा रद्द झाल्यामुळे ऐनदुष्काळात जलयुक्त शिवारच्या कामांना 'खो' बसणार आहे. माण - खटावच्या दुष्काळी उपाययोजनांबाबत अन्याय होत असताना या प्रकारामुळे वातावरण तापले आहे. जलयुक्त शिवार अभियान 2.0 हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. 2023-24 अंतर्गत सातारा जिल्ह्यातील 186 गावांची निवड करण्यात आलेली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने प्रशासकीय मान्यतेसाठी 87 अंदाजपत्रके (तांत्रिक मान्यताप्राप्त अंदाजपत्रकाची किंमत रुपये 1834.66 लाख) जिल्हास्तरीय समितीकडे सादर केली होती. कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने शिफारस केली होती. या कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
मात्र, शुद्धिपत्रक काढून यातील काही निविदा रद्द करण्यात आल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. या शुद्धिपत्रकात म्हटले आहे, की लघुपाटबंधारे विभागाकडील जलयुक्त शिवार अभियान 2.0 या लेखाशीर्षाअंतर्गत 1 जानेवारी 2024 ते 8 जानेवारी 2024 कालावधीकरिता निविदा सूचना क्र. 05 अन्वये 66 कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
प्रसिद्ध केलेल्या निविदांपैकी 49 निविदा या तांत्रिक कारणामुळे व निविदा स्वीकारणे अथवा नाकारणे या निविदा शर्तीमधील नमूद अटीस अधीन राहून या कामाच्या प्रसिद्ध केलेल्या ई-निविदा रद्द करण्यात येत आहेत. फक्त माण-खटाव मतदारसंघांतील ठराविक निविदाच रद्द झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
यामध्ये माण तालुक्यातील पाझर तलाव दुरुस्ती करणे, साठवण बंधारा बांधणे, साठवण बंधारा दुरुस्ती करणे, कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दुरुस्ती करणे, ग्राम तलाव दुरुस्ती करणे, तसेच खटाव तालुक्यातील साठवण बंधारा बांधणे, कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दुरुस्ती करणे या कामांचा समावेश होता.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.