

Solapur, 14 July : सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच पार पडली, त्या बैठकीला जिल्ह्यात तीन लोकप्रतिनिधी वगळता सर्व आमदार-खासदार उपस्थित होते. त्यात माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचाही समावेश होता. सोलापूरच्या डीपीसीला गैरहजर राहणारे खासदार मोहिते पाटील यांनी सातारा डीपीसीला आवर्जून हजेरी लावल्याचे दिसून आले.
वास्तविक माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिरस या चार तालुक्यांचा समावेश होतो, तर सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण या तालुक्यांचा समावेश होतो, त्यामुळे चार तालुके असलेले सोलापूर डीपीसीच्या बैठकीकडे पाठ फिरवून सातारा डीपीसी बैठकीला हजेरी लावणाऱ्या मोहिते पाटलांच्या खेळीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी झाली. त्याच दिवशी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची माळशिरस पंचायत समितीचे उपअभियंत्याला धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे कदाचित मोहिते पाटील यांनी त्या बैठकीला येण्याचे टाळले असावे, असे बोलले जात आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण या दोन्ही तालुक्यात मोहिते पाटील विरोधकांची सत्ता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत ज्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पराभव केला, त्यांची फलटणमध्ये सत्ता आहे, तर माणमध्ये सोलापूरचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे आमदार आहेत, त्यामुळे या दोन्ही नेत्यांशी मोहिते पाटलांचे विळ्या भोपळ्याचे नाते आहे.
लोकसभा निवडणुकीत आपल्या पाठीशी उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सातारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहून घेतल्याचे मानले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. माण आणि फलटणमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या समोर उभी ठाकली आहे, त्यामुळे पालकमंत्री खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पारड्यात झुकते माप टाकण्याची शक्यता आहे. त्यातूनच मोहिते पाटील यांनी सोलापूरमध्ये त्रास देणारे पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या माणमध्ये विशेष लक्ष दिल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.