
Solapur News: विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सोलापूर काँग्रेसमध्ये घडामोडी सुरू झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे वाढलेला आत्मविश्वास किंवा अतिआत्मविश्वास म्हणा, विधानसभेला उमेदवार देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून गफलत झाली.
ऐन मतदानाच्या दिवशी आघाडी धर्माला फाटा देण्यात आला. जिल्ह्यातून काँग्रेसचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी राजीनाम देत शिंदे पिता-पुत्रीवर निशाणा साधला आहे. खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मनमानी कारभारामुळे काँग्रेसची घडी पार विस्कटून गेली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मतदारसंघातून विजय मिळवला. त्यापूर्वी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून त्या सलग तीनवेळा विजयी झाल्या होत्या. त्यांचा अॅटिट्यूड आणि मनमानी कारभार, हे विषय नेहमीच चर्चेत असतात.
प्रणिती या काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या कन्या आहेत. जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्याची, त्यांना काय कळते, असे म्हणण्याची प्रथा राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीत रूढ झाली आहे. प्रणिती शिंदे याही याला अपवाद ठरलेल्या नाहीत.
वडिलांसोबत काम केलेल्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांना प्रणितीताई यांनी बाजूला सारले. त्यांनी कार्यकर्त्यांची नवी फळी तयार केली, हे नाकारता येत नाही, मात्र त्यांनाही त्या अपमानास्पद वागणूक देतात, असे सांगितले जाते.
नव्या पिढीतील काही उच्चशिक्षित कार्यकर्त्यांना त्यांनी बाजूला सारले आहे. यापैकी एका कार्यकर्त्याचे वडील जिल्हा काँग्रेसचे अनेकवर्षे पदाधिकारी होते. कार्यकर्त्यांना अॅटिट्यूड दाखवणाऱ्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) विधानसभेला सलग तीनवेळा आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीत कशा विजयी झाल्या, असा प्रश्न पडणे साहजिक आहे.
प्रणिती शिंदे या ग्राऊंडवर उतरून काम करतात. मतदारांशी त्यांचा बऱ्यापैकी थेट 'कनेक्ट' आहे. विधानसभा निवडणुकीत काहीवेळा त्यांच्या विरोधकांमध्ये मतविभागणी झाली. एका निवडणुकीत त्यांनी आपले कसब पणाला लावून विजय मिळवला.
अत्यंत खालच्या थराची टीका सहन करत त्यांनी विरोधकांना आस्मान दाखवले होते. असे असले तरी त्यांचा मनमानी कारभार आणि अॅटिट्यूड हा पक्ष संघटनेसाठी मारक ठरत आहे. विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर मतदारसंघात त्यांच्या अशा कारभाराची प्रचिती आली आहे.
महाविकास आघाडीत दक्षिण सोलापूर मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटला होता. शिवसेनेने अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीच्या काही महिने आधी माजी आमदार दिलीप माने हे स्वगृही काँग्रेसमध्ये आले होते ते या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल या अपेक्षेनेच. असे सांगितले जाते, की प्रणिती शिंदे यांनी माने यांच्यासाठी एबी फॉर्म आणला होता, मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एबी फॉर्म माने यांना देण्यास नकार कळवला. प्रणिती शिंदे यांनी एबी फॉर्म प्रदेश काँग्रेसच्या (Congress) परस्पर आणला होता, असे सांगितले जाते. त्यामुळे पटोले यांनी त्याला मान्यता दिली नव्हती.
धर्मराज काडादी यांनी या मतदारसंघातून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती, मात्र शिंदे पिता-पुत्री यांनी त्यांना शरद पवार यांच्याकडे पाठवले होते. जागा शिवसेनेला सुटल्यामुळे त्यांना पवार उमेदवारी देऊ शकले नाहीत. अखेर काडादी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
लोकसभा निवडणुकीतील सांगली पॅटर्न राबवण्याचा सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी विचार केलेला होता. त्यातूनच मतदानाच्या दिवशीच सुशीलकुमार शिंदे यांनी आघाडीचा धर्म बाजूला सारून काडादी यांना पाठिंबा दिला होता.
पाठिंबा मतदानाच्या दिवशी दिला असला तरी शिंदे पिता-पुत्रीने आपली यंत्रणा काडादी यांच्या पाठीशीच उभी केली होती. काही पदाधिकारी काडादी यांचा प्रचार करत होते, अशी चर्चा त्यावेळीच सुरू झाली होती. प्रणिती यांनी सलग तीनवेळा जिंकलेला सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघही या निवडणुकीत त्यांच्या ताब्यातून गेला.
प्रणितीताई या स्वतः निवडणूक लढवायच्या त्यावेळी दोन-अडीच महिने आधी तयारी सुरू करायच्या. मतदारसंघ पिंजून काढायच्या. लोकसभा निवडणुकीत त्यांनी असेच केले होते. सुशीलकुमार शिंदे काही महिने आधी मैदानात उतरले होते. विधानसभेच्या निवडणुकीत असे चित्र दिसले नाही.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते यांचा राजीनामा हा या सर्व घडामोडींचा, प्रणिती शिंदे यांच्या मनमानी कारभाराचा परिपाक आहे. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे काँग्रेस पक्षापेक्षाही मोठे झाले आहेत, असे मोहिते पाटील यांनी राजीनाम्यासोबत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. यामुळेच सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही, अशीही टीका त्यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही, कदाचित ही पहिलीच अशी निवडणूक असावी.
ताईंच्या, म्हणजे प्रणिती शिंदे यांच्या अॅटिट्यूडचे करायचे काय, असा प्रश्न कार्यकर्ते आणि पक्षासमोरही आहे. ताईंच्या समोर मोठे राजकीय भवितव्य आहे. अॅटिट्यूड बाजूला सारल्यास, उच्चशिक्षित कार्यकर्त्यांना मान-सन्मान दिल्यास, जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची फळी बांधल्यास ताईंच्या वाट्याला उज्ज्वल राजकीय भवितव्य येऊ शकते.
ताईंना याची जाणीव नसावी, असे म्हणता येणार नाही, मात्र अॅटिट्यूड आडवा येतो, कार्यकर्त्यांना कमी लेखण्याची सवय आडवी येते. मतदारांना भरपूर पर्याय उपलब्ध असतात, हे ताईंना माहित नाही, असेही म्हणता येणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.