
Ahilyanagar News : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर होत असलेल्या आरोपावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. "पुन्हा पुन्हा तेच प्रकरण बाहेर काढले जात आहे. त्या कुटुंबाला (ठाकरे परिवाराला) मी जवळून ओळखतो. त्या कुटुंबावर दहशत निर्माण केली जात आहे. यातून द्वेषाचे राजकारण सत्ताधारी पक्षाकडून कुठेतरी ठाकरे परिवाराविरुद्ध शिजवले जात आहे", असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.
'सकाळ माध्यम समूह'च्या अहिल्यानगरच्या दैनिक सकाळ आवृत्तीने आयोजित केलेल्या पुस्तक महोत्सवात बाळासाहेब थोरात सहभागी झाले होते. 'सकाळ माध्यम समूह'च्या पुस्तक महोत्सवाचे कौतुक करून पुस्तक खरेदी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी तिच्या आई-वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवरून सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत मोठा गदारोळ केला. आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह प्रकरणात अशी निगडित असलेल्यांना अटक करण्याची मागणी केली. यावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली.
बाळासाहेब थोरात (Balasheb Thorat) म्हणाले, "राजकारणाचा स्तर किती खाली गेला आहे हे, दाखवणारे उदाहरण म्हणजे हे प्रकरण आहे. राजकारण असतं. मतभेद असतात. काही प्रश्न खूपच जटिल असतात, ते चर्चेने सोडवावे लागतात. कोणाचे व्यक्तिगत जीवन उदध्वस्त करणार असाल आणि त्यातून राजकारण साध्य करणार असाल, तर हा राजकारणाचा स्तर लोकशाहीला घातक आहे.'
हे प्रकरण पुन्हा पुन्हा बाहेर काढलं जात आहे. त्यातून त्या कुटुंबावर (ठाकरे परिवारावर) दहशत निर्माण केली जात आहे. यातून अत्यंत चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली घसरतो आहे, ढासळतो आहे, हेच लक्षात येत आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.