
पूरग्रस्त भागात भेटीदरम्यान एका शेतकऱ्याने मदतीची व्यथा मांडल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “राजकारण नको” असे सुनावले. पोलिसांनी त्याला बाजूला नेले.
परांड येथे कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिडून कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली.
सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांच्या वेदना ऐकण्याऐवजी दोन्ही नेत्यांची असंवेदनशील प्रतिक्रिया जनतेत संताप निर्माण करत आहे.
Solapur, 25 September : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे बुधवारपासून (ता. 24 सप्टेंबर) अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आहेत. गेली महिना-दीड महिन्यापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा सर्वकाही हरवून बसला आहे, त्यामुळे महिनाभरापासून त्याचा मनात दबून राहिलेल्या संतापाचा उद्रेक मंत्र्यांच्या दौऱ्यात दिसून आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री पवार यांना ‘मदत जाहीर करा, कर्जमाफी द्या’ म्हणणाऱ्या शेतकऱ्यांविषयी केलेल्या विधानाने त्यांच्या जखमेवर फुंकर मारण्याऐवजी त्यावर मीठ चोळण्यासारखा प्रकार जबाबदार नेत्यांकडून होताना दिसला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना धाराशिवमधील वाघेगव्हाणमधील ‘मला जीव पहिजे’ म्हणाऱ्या मुलीच्या डोळ्यातील भीती दिसली नाही का? गाळात गेलेल्या सोयाबीनमध्ये लोळणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा समजली नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुकीतून सपाटून मार खाणाऱ्या भाजप-महायुतीने (Mahayuti) विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीणपासून कर्जमाफीपर्यंत अनेक आश्वासन दिले आणि सत्ता हस्तगत केली. मध्यंतरी वाढलेल्या आत्महत्यावरून कर्जमाफीच्या विषयाने उचल खालली होती. मात्र योग्यवेळी कर्जमाफी देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची संपूर्ण पिके वाहून गेली आहेत. घरादारात पुराचे पाणी जाऊन संपूर्ण घरसंसार, धान्य वाहून गेले आहे. घरात सर्वत्र गाळ साचलेला आहे. प्यायला पाणी आणि खायला अन्नही सध्या शेतकऱ्याकडे नाही. कारण सर्वकाही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. ऊसासारखी पिके पाण्यात बुडाली होती. त्यामुळे सोयाबीन इतर भुसार पिकांचे तर विचारायलाच नको. पण मायबाप सरकार काय शेतकऱ्यांकडे पहायला तयार नाही.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढाव घेण्यासाठी मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातून सुरुवात केली. मदत देण्यात येईल, नियम बाजूला ठेवून भरपाई दिली जाईल, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र ठोस कोणतीही घोषणा केलेली नाही, त्यामुळे अगोदरच पावसाने झोडपलेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट झाला.
सोलापूरमधून लातूरमध्ये गेलेल्या मुख्यमंत्र्यांना एका शेतकऱ्याने ‘हेक्टरी किती मदत करणार, हे जाहीर करा. नुसत्या घोषणा करू नका,’ अशी मागणी केली. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘ये बाबा, राजकारण करू नको इथे. राजकारण नाय करायचे’ असे सुनावले. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणाऱ्या त्या शेतकऱ्याला पोलिसांनी त्या ठिकाणी दुसरीकडे नेले. त्यामुळे सर्वस्व हरवलेल्या बळीराजाला आपली व्यथा कुणाकडे मांडायचा. अतिवृष्टी आणि पुराच्या संकटात सर्वस्व हरवलेला बळीराजा काय राजकारण करणार, असा प्रश्न उपस्थित हेात आहे.
दुसरीकडे, परांड येथे नुकसानग्रस्तांना संवाद साधताना एका शेतकऱ्याने ‘दादा कर्जमाफी करा ना’ अशी मागणी केली. त्यावर अजितदादा चिडले. आम्हाला कळंतय ना. त्याला द्या रे मुख्यमंत्रिपद. आम्ही काय इथं गोट्या खेळाला आलोय का. जे काम करतंय ना त्याचीच .... असेही त्यांनी त्या शेतकऱ्याला ऐकवले.
एकंदरीतच मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संयम राखता आला नाही. फडणवीस आवरते घेतले. मात्र, अजितदादा आपल्या नेहमीच्या शैलीत दांडपट्टा चालवत होते. तसेच सगळ्या गोष्टींची सोंग करता येतात, पण पैशाचा सोंग करता येत नाही, असेही त्यांनी ऐकवले.
मुख्यमंत्री महोदय, ज्या शेतकऱ्याने आपल्या आयुष्याची सर्व पुंजी गमावली आहे. ज्यांच्या घरात आणि शेतातही पाणीच पाणी आहे. पिके तर गेलीच आहेत. या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपासून घरादाराची राखरांगोळी झाली आहे, त्याच्या संवेदना तुम्ही ना कोण समजून घेणार. पिचलेला आणि सर्वस्व गमावलेला शेतकरी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही तर आणखी कोणाला विचारणार. पण आपणच शेतकऱ्यांना अशा पद्धतीने गप्प करणार असाल तर शेतकऱ्यांनी आपली दुःखं मांडायची तरी कोठे, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्र: शेतकऱ्याला “राजकारण नको” असे कोणी सुनावले?
उ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
प्र: कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्याला कठोर शब्दात प्रत्युत्तर कोणी दिले?
उ: उपमुख्यमंत्री अजित पवार.
प्र: शेतकऱ्यांनी नेत्यांना कोणती मुख्य मागणी केली होती?
उ: अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन कर्जमाफीची.
प्र: जनतेत असंतोषाचे कारण काय आहे?
उ: शेतकऱ्यांच्या दुःखावर सहानुभूती न दाखवता नेत्यांनी त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.