
Solapur, 31 May : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची फळे आता राज्यात दिसू लागली आहेत. जरांगे पाटील यांच्या आग्रहामुळे त्या वेळी अवघ्या दोन महिन्यांत 43 हजार 974 जणांना मराठा कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले होते, त्यावेळी कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळालेल्या वर्षाराणी संतोष वडणे ह्या धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील कुंभारी गावच्या सरपंच बनल्या आहेत. राज्यातील पहिल्या कुणबी मराठा सरपंच होण्याचा मान वर्षाराणी वडणे यांना मिळाला आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गेल्या दोन वर्षांपासून उपोषणे, आंदोलने केली. ते अजूनही सरकारला आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा देत आहेत. मात्र, मागील आंदोलनावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कुणबी मराठा प्रमाणपत्रामुळे ओबीसीच्या जागेवरही मराठा समाजातील व्यक्तीला निवडणूक लढवता येते, त्यामुळे कुणबी मराठा प्रमाणपत्र असलेल्या वर्षाराणी वडणे यांची तुळजापूर तालुक्यातील कुंभारी गावच्या सरपंचपदी निवड झाली आहे.
वर्षाराणी संतोष वडणे यांचे माहेर सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील आहे. त्यांचे माहेरकडील नाव वर्षाराणी सत्यवान दळवे असे आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी शिंदे समितीकडून कुणबी (Kunbi) नोंदी शोधण्याचे काम सुरू होते, त्यावेळी वर्षाराणी दळवे यांची माहेरकडे कुणबी नोंद असल्याचे आढळून आले, त्या नोंदीच्या आधारे वर्षाराणी दळवे यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
मराठा कुणबी दाखल्यामुळे वर्षाराणी दळवे यांचा समावेश ओबीसीमध्ये झाला. माहेरकडून मिळालेल्या मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे वर्षाराणी वडणे यांची तुळजापूर तालुक्यातील कुंभारी गावच्या निवडणुकीत सरपंचपदी निवड झाली आहे
कुंभारी गावच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत वर्षाराणी संतोष वडणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या जागेवर विजय मिळविल्यानंतर शुक्रवारी (ता. ३० मे) झालेल्या सरपंचपदाच्या निवडीच्या बैठकीत वर्षाराणी वडणे या ओबीसी जागेवर कुणबी मराठा म्हणून बिनविरोध निवडल्या गेल्या. त्यामुळे वर्षाराणी संतोष वडणे या राज्यातील पहिल्या कुणबी मराठा सरपंच ठरल्या आहेत.
तुळजापूर तालुक्यातील कुंभारी गावच्या सरपंचपदी निवडून आल्यानंतर वर्षाराणी वडणे यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने तुळजापुरात सत्कार करण्यात आला आहे. तसेच, वर्षाराणी दळवे यांच्या मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील माहेरमध्ये या निवडीबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.