

Solapur, 01 September : माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यावर अमेरिकेत यशस्वीपणे हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे. त्या अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रियेनंतर बबनदादा ते तब्बल १४ महिन्यांनंतर मायभूमीत म्हणजे माढ्यात आज (ता. ०१ सप्टेंबर) सकाळी दाखल झाले, त्यांचे माढा तालुक्याच्या वेशीवर रांजणीत भव्य स्वागत करण्यात आले.
माजी आमदार शिंदे यांना गेली २० वर्षांपासून हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्यावर यापूर्वी ऑंजिओप्लॉस्टी आणि बायपासची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांचं हृदय केवळ ३० टक्केच काम करत होतं, त्यामुळे हृदयरोग तज्ज्ञांनी त्यांना हृदयप्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता.
टेंभुर्णीचे डॉ. अमित पावले यांच्यासोबतही त्यांची चर्चा झाली होती. त्यानंतर बबनराव शिंदे यांनी अमेरिकेत हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते १३ जून २०२५ रोजी ते अमेरिकेला गेले होते. मूळचे टेंभूर्णीचे पण सध्या अमेरिकेतील सेंट लुईस येथील बी. जे. सी. हॉस्पिटलचे डीन डॉ. अमित पावले यांनी बबनराव शिंदे यांच्यावर १८ ऑगस्ट २०२५ रोजी यशस्वीपणे हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. पण त्यासाठी त्यांना तीन महिने अगोदर अमेरिकेतील सेंट लुईस येथे जाऊन राहावे लागले होते.
इन्फेक्शनचा धोका होऊ नये; म्हणून शस्त्रक्रिया झाल्यानंतरही बबनदादा हे गेली एक वर्षापासून अमेरिकेत डॉक्टरांच्या निगराणीखाली होते. प्रत्येक महिन्याला तपासणी केली जात होती. तब्बल १४ महिन्यांनंतर बबनराव शिंदे हे २६ ऑगस्ट रोजी मुंबईत परतले होते. त्यानंतर ते पुण्यात राहिले आणि आज अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून बबनदादा शिंदे हे माढ्यात दाखल झाले.
माढ्याच्या वेशीवर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या प्रवाशासाठी खास अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेल्या व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली होती, त्यातून त्यांनी संपूर्ण प्रवास केला. ठिकठिकाणी त्यांचे जनतेतून फुलांची उधळण करत भव्य स्वागत करण्यात आले.
माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर माजी आमदार बबनराव शिंदे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह भाजपचे आजी माजी आमदार उपस्थित आहेत.
अमेरिकेतून आल्यानंतर माजी आमदार बबनराव शिंदे म्हणाले, अमेरिकेत माझ्यावर डॉ. अमित पावले आणि सहकाऱ्यांनी गुंतागुंताची हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. माढ्यातील जनतेला मी आग्रहाची विनंती करणार आहे. गेल्या वर्षी माझ्या आयुष्यात मोठी परीक्षा झाली. माझ्यावर अमेरिकेत गुंतागुंताची शस्त्रक्रिया झाली. पांडुरंगाची कृपा, जनतेचे आशीर्वाद आणि माझ्यासाठी त्यांनी गावोगावच्या दैवतांना मागितलेले वरदान यामुळे या शस्त्रक्रियेतून सुखरुप बाहेर आलेलो आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही गोष्टी पाळाव्या लागणार आहेत. आपल्याला सोशल डिस्टन्स पाळावे लागणार आहे. माढ्यातील जनतेच्या आशीर्वादामुळे मी व्यवस्थितपणे बरा झालेलो आहे. यापुढे आपले सहकार्य, प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत कायम ठेवावेत, असे आवाहन बबनराव शिंदे यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.