Solapur, 07 November : बार्शीच्या राजकारणात माजी मंत्री दिलीप सोपल आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील वाद नवा नाही. मात्र, बार्शीत पुन्हा राऊत आणि सोपल वाद नव्याने पेटला आहे. माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बार्शी येथील घराबाहेर आमदार राजेंद्र राऊत यांच्या समर्थकांनी केलेली हुल्लडबाजी कारणीभूत ठरली आहे. मात्र, तुम्ही अश्लिल चाळे करत असाल तर तुम्हाला उलट प्रत्युत्तर मिळणारच, असा इशारा राजेंद्र राऊत यांनी सोपल समर्थकांना दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल (Dilip Sopal) हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आमने सामने आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी मंत्री दिलीप सोपल हे पुन्हा एकदा विधानसभेसाठी आपले नशीब आजमावत आहेत.
दुसरीकडे, मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. मात्र, बार्शी विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटल्यामुळे राऊत यांना शिवसेनेत प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढवावी लागत आहे.
आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री माजी आमदार दिलीप सोपल यांच्या घराबाहेर हुल्लडबाजी केली. यामध्ये आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांनीही सोपल यांच्या घराकडे पाहून आक्षेपार्ह हावभाव केले, असा आरोप करण्यात आला आहे, त्यामुळे हे दोन्ही गट पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकले आहेत.
सोपल गटाचे माजी नगरसेवक नागेश अक्कलकोटे म्हणाले, आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांनी बुधवारी रात्री महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त असूनही माज आणि मस्तीचे प्रदर्शन केले.
रणवीर राऊत यांनी बुलेटवर उभे राहून अर्वाच्या भाषेत घोषणा देऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिस आणि निवडणूक आयोगाकडून यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. पराभवाच्या भीतीमुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. हा माज आणि मस्ती उतरवण्याचे काम बार्शीकर निश्चितपणे करतील.
यासंदर्भात राजेंद्र राऊत म्हणाले, बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे माझ्या प्रचाराच्या निमित्ताने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या रॅलीहून परत येत असताना सोपल यांच्या बंधूंनी रॅलीतील तरुणाकडे पाहून आक्षेपार्ह हावभाव केले. त्यामुळे चिडलेल्या तरुणांकडून त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न झालेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.