

Satara, 17 August : जावळीच्या राजकारणात सोसायट्यांच्या ठरावांवरून सुरू असलेला संघर्ष आता थेट आमने सामनेच्या इशाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. आपल्या कार्यकर्त्यांना शशिकांत शिंदे गटाकडून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिंदे यांना थेट इशारा दिला आहे.
आर. डी. वरोशीसह तीन सोसायट्यांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. मात्र, हा प्रयत्न हाणून पाडल्याचे त्यांनी सांगितले. आखाडे विकास सोसायटीच्या ठरावावेळीही वातावरण तणावपूर्ण करण्याचा प्रयत्न झाला होता.
कार्यकर्त्यांना दहशत, दमदाटी किंवा दादागिरीचा सामना करावा लागला, तर त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी आपण मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी घेतला आहे.
ठरावाच्या प्रक्रियेनंतर एका कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेवरूनही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ‘कोण दहशत करते, कोण दडपशाही करते आणि कोण दमदाटी करते, हे आता सर्वांना कळून आलं आहे. लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्षात वेगळे वागायचे, हे चालणार नाही, असा घणाघातही भोसले यांनी केला.
धाकधपटशाही दाखवली तर जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय झाला किंवा त्यांना मारहाण झाली, तर संघर्ष करण्याची आमची ११० टक्के तयारी आहे, असा थेट इशाराच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे. त्यामुळे जावळीतील सोसायट्यांच्या ठरावांचा वाद आता सहकारी संस्थांपुरता मर्यादित न राहता दोन राजकीय गटांमधील संघर्षाचे स्वरूप घेताना दिसत आहे. शिवेंद्रसिंहराजेंच्या इशाऱ्यानंतर शशिकांत शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे जावळीचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.