

Gokul election news: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून कोल्हापूरच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीत समविचारी आघाडीला बहुमत मिळाले असले, तरी अध्यक्ष निवडीच्या बैठकीसाठी आवश्यक कोरम पूर्ण होत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून 'अध्यक्ष'पद मिळवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अध्यक्षपदाचे वातावरण तापण्याची शक्यता आहे.
'गोकुळ'च्या निवडणुकीत समविचारी आघाडीचा अध्यक्ष करण्यासाठी निवड बैठकीतील कोरमची पूर्तता होतं नसल्याने मोठी अडचण झाली आहे. अशातच महायुतीकडून अध्यक्ष करण्यासाठी मोठ्या घडामोडी पडद्यामागून सुरु आहेत. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने पडद्यामागून हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
महायुतीच्या पातळीवर गेली दोन दिवस राजकीय खलबतेंना वेग आला असून दोन अशासकीय सदस्य नेमून त्यांना मताचा अधिकार देण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपचा अध्यक्ष करण्याची रणनीती या हालचालीमागे आहे. असे करून बहुमताचा आकडा गाठण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरु आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत यावर निर्णय होणे अपेक्षित असताना मंत्री हसन मुश्रीफ व आमदार विनय कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा 'गोकुळ'च्या राजकारणात भूकंप होण्याची चिन्हे आहेत.
'गोकुळ'च्या निवडणुकीत काँग्रेस समविचारी आघाडीला २५ पैकी १३, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीला बहुमत मिळाले तरी सभेचा कोरम पूर्ण करण्यासाठी १४ संचालकांची गरज आहे. कोरमवरून तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने महायुतीचे संचालक गैरहजर राहण्याची व्यूहरचना आखली जात आहे.
सत्तेपर्यंत जाण्यासाठी महायुतीकडून आणखी दोन संचालकांची गरज आहे. त्यासाठी चाचपणी सुरु आहे. महायुतीकडून समविचारी आघाडीतील संचालकांना हाताशी धरण्याचा प्रयत्न होतं आहे. मात्र काहीच हाताला लागत नसल्याने शासकीय सदस्यांची नियुक्ती करून त्यांना अध्यक्ष निवडीत मतदानाचा अधिकार देता येतो का? याची चाचपणी गेली दोन दिवस शासन पातळीवर सुरु आहे. तर आमदार सतेज पाटील यांनी देखील महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा सुरु ठेवली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात पुढील घडामोडी घडण्याचा अंदाज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.