

Kolhapur News : करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांची पदोन्नतीवर बदली छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सह आयुक्त (पुनर्वसन) म्हणून झाली आहे. आज त्यांच्या बदलीचे आदेश प्रसिद्ध झाले. मात्र, मतदारयादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम (एस.आय.आर) पूर्ण झाल्याशिवाय त्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.
राज्यातील उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्या पदोन्नती देण्यात आली असून, त्याची यादी आज जाहीर झाली. चौगुले यांनी १२ जून २०२५ मध्ये करवीर प्रांताधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे. त्यांनी गोकुळ निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. चौगुले यांच्या पदावर अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही.
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेला वाद आता मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पोहोचला आहे. शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी झालेली निवड वैध ठरवण्याच्या मागणीवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे गोकुळच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी आयोजित सभा कोरमअभावी गुरुवारी तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने बहुमताचा दावा करत शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले होते. मात्र, अध्यक्ष निवडीची अधिकृत सभा कोरमअभावी तहकूब झाल्याने या निवडीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर समविचारी आघाडीने न्यायालयात धाव घेतली आहे.
चुयेकर यांची अध्यक्षपदी झालेली निवड वैध ठरवावी, अशी मागणी करणारी याचिका समविचारी आघाडीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती अभय आहुजा आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने महायुतीच्या १२ संचालकांसह शासनाला आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
आता सोमवारी या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असून, न्यायालयाच्या आदेशावर तहकूब सभेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. या घडामोडींमुळे गोकुळच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाली वाढल्या आहेत. अध्यक्ष निवडीच्या वादावर न्यायालय काय भूमिका घेते, यावर पुढील राजकीय समीकरणे ठरण्याची शक्यता आहे.
एकीकडे गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा वाद आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पदोन्नतीचा आदेश एकाच वेळी चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, चौगुले यांच्या बदलीचा अध्यक्ष निवडीच्या न्यायालयीन प्रकरणाशी संबंध असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.