

Kolhapur News : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला ठरावधारकांनी कौल दिला असला, तरी त्यांच्यासमोर कोरम पूर्ण करण्याची तांत्रिक अडचण उभी राहिली आहे. त्यामुळे काठावरच महायुतीचे उमेदवार विजयी झाले असले, तरी गोकुळ दूध संघावर सत्ता स्थापन करण्यासाठी आता दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू झाले आहेत.
कोल्हापूर जिल्हा नेहमीच भावनिकतेला साथ देत आला आहे. मागील काही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा अंदाज घेतला, तर जनतेने दिलेला कौल जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचा ठरला आहे. मात्र, गोकुळसारख्या सहकारातील संस्थांमध्ये हा कौल एका भावनेचा नसून अर्थकारण आणि सत्ताकारणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आहे.
त्यामुळे जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असणाऱ्या गोकुळ दूध संघाचे भवितव्य हे भविष्यात येणाऱ्या अडचणी, दुष्काळाचा करावा लागणारा सामना आणि स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न यांवर अवलंबून आहे. मात्र, सध्या गोकुळच्या अध्यक्षपदासंदर्भात सुरू असलेली राजकीय स्थिती पाहिली, तर भावनिकतेच्या मुद्द्याला प्राधान्य देण्यापेक्षा व्यावहारिक आणि आव्हानांना तोंड देणाऱ्या अध्यक्षाची गरज महत्त्वाची आहे.
गोकुळच्या निवडणुकीत समविचारी आघाडीला १३ जागा, तर महायुतीला १२ जागांवर विजय मिळाला आहे. सहकार कायद्यानुसार कोरम पूर्ण करण्यासाठी एकूण संचालकांपैकी निम्म्या जागा अधिक एक असे गणित जुळणे आवश्यक आहे. त्यामुळे समविचारी आघाडीला आणखी एका जागेची आवश्यकता आहे, तर महायुतीला आणखी दोन जागांची आवश्यकता आहे. येत्या २९ ऑक्टोबरला गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.
समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर यांचे अध्यक्षपदासाठी नाव निश्चित समजले जाते. तर महायुतीकडून भाजपमधून डॉ. चेतन नरके किंवा अंबरीश घाटगे यांचे नाव समोर येऊ शकते. शिवाय, सध्या शासननियुक्त म्हणून आणखी दोन संचालक वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचे प्रयत्नही केले जाण्याची शक्यता आहे. त्यातून भाजपमधून आणखी एक नाव अध्यक्षपदासाठी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास, समविचारी आघाडीकडून गोकुळमध्ये ज्यांचे योगदान आहे, अशा व्यक्तीचा मुलगा शशिकांत पाटील चुयेकर यांना अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मग ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचे चिरंजीव डॉ. चेतन नरके हे देखील आशादायी का असू नयेत, अशी भावना महायुतीमधून निर्माण होत आहे.
शिवाय, आणखी एका अनुभवी व्यक्तीचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या या घडामोडींचा अंदाज घेतला, तर निवडणुकीपासून सुरू असलेली अंतर्गत स्पर्धा आणि ईर्ष्या आजही सुरू आहे. जरी अध्यक्ष कोणीही झाला, तरी भविष्यात गोकुळसमोरील समस्या आणि वास्तवाला त्या अध्यक्षाला तोंड द्यावे लागणार आहे.
सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. गोकुळ दूध संघाचा सर्व डोलारा हा दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. दूध उत्पादक शेतकरी हा गाय आणि म्हशींवर अवलंबून आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत या जनावरांना चारा टंचाई निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांपैकी आठ तालुक्यांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत. अशा परिस्थितीत चारा टंचाई निर्माण झाल्यास त्याचा थेट फटका दूध उत्पादनाला बसणार आहे. म्हणजेच, गोकुळ दूध संघावरही त्याचा परिणाम दिसणार आहे.
सध्याचा प्रतिलिटर उत्पादन खर्च आणि भविष्यातील प्रतिलिटर उत्पादन खर्च यांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनावरांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच सुका चारा यंदा महागण्याची शक्यता आहे. परिणामी, तो उपलब्ध होणेही कठीण होऊ शकते. अशा परिस्थितीत पशुखाद्याचे दर वाढण्याची चिन्हे आहेत. वाढलेले पशुखाद्याचे दर आणि चारा टंचाई यांचा परिणाम थेट प्रतिलिटर दूधदरावर होणार आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोकुळ दूध संघामध्ये दूध संकलन वाढवण्याचा अनेकांनी आवर्जून जाहीरनाम्यात उल्लेख केला आहे. मात्र, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दूध संकलनावर होणारा परिणाम महत्त्वाचा ठरणार आहे. अशा परिस्थितीत दूध संकलन वाढवणे हे अध्यक्षांसमोर मोठे आव्हान असणार आहे. शिवाय, कोणतीही सहकारी संस्था चालवण्यासाठी संस्थेच्या प्रमुखांचे केंद्र आणि राज्य सरकारसोबत समन्वयाचे संबंध असायला हवेत. यातूनच गोकुळसारख्या दूध संस्थांना राज्य आणि केंद्र सरकारकडून अनेक सेवा-सुविधांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.
राज्यात नंबर वन असणाऱ्या गोकुळ दूध संघाला सध्या परराज्यांतील दूध संस्थांच्या वाढत्या स्पर्धेमुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अमूल, हॅटसन यांसारख्या मोठ्या दूध संस्थांनी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बल्क मिल्क कूलिंग सेंटर सुरू केले आहेत. गोकुळ दूध संघापेक्षा चार रुपये अधिक दर देऊन दूध उत्पादकांकडून दूध खरेदी करण्याचा प्रयत्न या संस्थांकडून सुरू आहे. त्याचा परिणाम थेट गोकुळसारख्या दूध संघावर होणार आहे. त्यामुळे स्पर्धक संघांना आव्हान देण्याची धमक नव्या अध्यक्षांमध्ये असावी.
गोकुळ दूध संघामुळे जिल्ह्यातील पाच लाख कुटुंबे आर्थिकदृष्ट्या प्रगत झाली आहेत. अनेकांचा उदरनिर्वाह याच दूध संघावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत अनुभव, आर्थिक नियोजन आणि व्यावहारिक सामंजस्य हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. निवडणुकीदरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या घटना समोर आल्या. परिणामी, मागील संचालक दोन गटांत विभागले गेल्याने या विषयांवर न बोलणे पसंत केले गेले. मात्र, जाजम घोटाळा, किकवी आणि वाहतूक खर्च यांसारख्या कथित घोटाळ्यांची माहिती सर्वांसमोर आणणे, तसेच त्यामध्ये तथ्य असेल तर दोषींवर कारवाई करणे, हे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.