

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती मधील अंतर्गत संघर्ष व गुंता दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. यापूर्वी संस्था पात्र अपात्रे ते वरून भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये सुरू असलेला संघर्ष संपला असताना आता जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरून दोघांमधील संघर्ष वाढला आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत ज्याचे अधिक ठराव त्याला अधिक जागा हे सूत्र ठरले असताना त्याला भाजपच्या काही नेत्यांकडून विरोध सुरू झाला आहे. भाजपकडून सन्मान जनक जागा मिळण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून तो राष्ट्रवादीच्या नेत्यांना मान्य नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोकुळ मध्ये भूकंपाचे चिन्ह निर्माण झाली आहेत.
महायुतीतील सर्वपक्षीय नेत्यांनी मोठा गाजावाजा करत आणि शक्तिप्रदर्शन करत ठरावाचा आकडा फुगवलेला दिसतो. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठराव दाखल केले. त्यांनी जवळपास 1971 दाखल केल्याचा दावा केला. भाजपकडून 1431, शिवसेनेकडून 1514 तर जनसुराज्य कडून 547 ठराव असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर काँग्रेसकडे 1851 ठराव असल्याचा दावा केला.
पण प्रत्यक्षात 5439 ठराव दाखल झाले आहेत. मध्ये दुबार ठराव 56 इतके आहेत. करवीर 867, भुदरगड 595, राधानगरी 703, कागल 621, पन्हाळा 515, गगनबावडा 132, शाहुवाडी 445, शिरोळ 270, चंदगड 424, आजरा 305, गडहिंग्लज 401, हातकणंगले 161 असे तालुका निहाय ठराव जमा झाले आहेत. तर 31 संस्थानी ठराव दाखल केले नाहीत. देशात ज्यावेळी या ठरावांची छाननी झाली न्यायालयीन लढाई झाली त्यावेळी मात्र गोकुळ दूध संघाच्या अंतिम मतदार यादीत जवळपास 5423 दूध संस्थांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे.
ठराव दाखल करत असताना अनेक संस्थांनी कोणताही नेता आपल्यावर नाराज नको या भूमिकेतून दोन वेगवेगळ्या ठिकाणी ठराव दिल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाकडे किती ठराव आहेत याचा निश्चित आकडा आत्ताच सांगणे कठीण आहे. त्यामुळे ठरावाच्या गणितावर जागा वाटपाचा फॉर्मुला महायुतीच्या बैठकीत ठरला असला तरी भाजपच्या काही नेत्यांकडून या फॉर्म्युल्याला विरोध होत आहे.
महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना महायुतीकडे ठरावांचे संख्याबळ अधिक आहे. शिवाय राज्यात भाजप मोठा भाऊ असल्याने गोकुळ दूध संघामध्ये देखील भाजपला महत्त्वाचे स्थान आणि सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी अपेक्षा भाजपच्या नेत्यांना आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ठरावानुसारच जागा वाटप करण्याची भूमिका ठाम ठेवली आहे. यातूनच पुन्हा एकदा अंतर्गत ठिणगी पेटली आहे. राष्ट्रवादीकडून ठरावानुसार जागावाटप व्हावे तर भाजपकडून महायुती म्हणून जागा वाटप व्हावे असा फॉर्म्युला पुढे येत आहे. त्यामुळे जागा वाटपाची चर्चा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचे समजते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी मोठा भाऊ ठरणार अशी भूमिका गोकुळ मध्ये घेतली आहे. सर्वाधिक ठराव हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचा दावा मंत्री मुश्रीफ यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांपुढे भाजपच्या काही नेत्यांनी त्यांचे ठराव अधिक कसे? शिवाय अनेक संस्थांनी दोन्हीकडे ठराव दिले असल्याचे हे मुद्दे पटवून देण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे महायुती म्हणून जागावाटप करण्याच्या हालचाली भाजपच्या गोटातून सुरू आहेत. त्याला मंत्री हसन मुश्रीफ यांचा विरोध आहे. त्यामुळे प्राथमिक टप्प्यातील जिल्हास्तरीय बैठक फिस्कटली असल्याचे सांगितले जाते.
तर सध्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. कालपासून गोकुळ दूध संघाच्या उमेदवारी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी गोकुळचे माजी अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्यासह बाळासाहेब खाडे यांनी महायुती मधून अर्ज दाखल केला. गोकुळ मध्ये सर्वांनाच सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अधिक ठराव असल्याने त्यांनी दहा जागांवर दावा केला आहे.
तर दुसरीकडे भाजपने देखील जनसुराज्य शक्तीसह अकरा जागांवर दावा केला आहे. मात्र या प्रस्तावाला परस्पर दोघांच्याकडूनही विरोध होताना दिसत आहे. मंत्री मुश्रीफ हे भाजपला सहा-सात जागा देण्यावर सहमत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. मात्र यापूर्वी संस्था पात्र अपात्र ते वरून झालेल्या महायुतीच्या अंतर्गत संघर्षाने गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला उकळी फुटली असताना पुन्हा एकदा या प्रकारावर महायुती मधील अंतर्गत संघर्ष समोर येणार आहे. त्याचा परिणाम प्रत्यक्षात निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.