

Kolhapur News, 28 Sep : ठरावाची खातरजमा करूनच गोकुळच्या जागा वाटपाचे महायुतीचे सूत्र केवळ फार्स ठरले. रविवारी झालेल्या बैठकीत महायुतीमध्ये बैठकीत पुन्हा एकदा गोंधळ झाला. बहुतांश सर्वच तालुक्यांतील ठराव हे तिन्ही पक्षांकडे असल्याचे झालेल्या बैठकीतून दिसले. यातून महायुतीमधील अंतर्गत वाद वाढत गेले.
अखेर ठरावांची खातरजमा करणे थांबवून पक्षनिहाय जागा वाटप करावे. जागावाटपाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवून अंतिम निर्णय त्यांनी घ्यावा, असे महायुतीमधील नेत्यांनी ठरवले. शिवाय प्राथमिक टप्प्यात प्रत्येकाला 5, व जनसुराज्याला 2, यड्रावकर यांना एक असे जागावाटप ठरल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत उर्वरित जागावाटप केले जाणार आहे.
या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. गोकुळ निवडणुकीच्या जागा वाटपाच्या दृष्टीने महायुतीची पहिली बैठक गेल्या आठवड्यात झाली. यात प्रत्येक पक्षाने आपल्याकडे किती ठराव, याचा दावा केला होता. पक्षनिहाय कोणाकडे किती ठराव आहेत, याची खातरजमा करण्यासाठी आज भाजप कार्यालय आणि एका हॉटेलमध्ये महायुतीची बैठक झाली; मात्र या बैठकीत ठरावांची खातरजमा करण्याऐवजी वादच होत गेले.
त्यानंतर तालुका निहाय झालेल्या बैठकीत बरेचसे ठराव तिन्ही पक्षांकडे असल्याचे दिसून आले. आजरा तालुक्यातील १६ ठरावांवर तिन्ही पक्षांनी दावा केला. यामुळे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात वादाचे प्रसंग घडत होते. हे लक्षात आल्यावर नेत्यांनी ठरावांची खातरजमा करण्याचा फार्स अखेर गुंडाळला. बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, विनय कोरे, अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी मंत्री भरमुअण्णा पाटील, माजी आमदार संजय घाटगे, अरुण नरके, विश्वास पाटील होते.
गोकुळ निवडणुकीच्या दृष्टीने कोणत्या पक्षाकडे किती ठराव आहेत, याची खातरजमा करण्याची ही बैठक होती. त्याप्रमाणे ही खातरजमा झाली. त्यानंतर जागा वाटपाबाबत प्राथिमक चर्चा झाली. अद्याप याबद्दल निश्चित सूत्र ठरलेले नाही. कोणत्या पक्षाला किती जागा, हे निश्चित झाल्यावरच त्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवू त्यानंतर अंतिम निर्णय होईल, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
बैठकीच्या ठिकाणीच करवीर, पन्हाळा, गडहिंग्लज, आजरा, हातकणंगले आणि भुदरगड या सहा तालुक्यातील ठरावांची पडताळणीही सुरु होती. राष्ट्रवादीने 1700, भाजपने 1350, शिवसेना शिंदेगटाने 1300 ठराव असल्याचा दावा केला. मात्र ठरावांवरुन एकमत होत नसल्याने नेत्यांमध्ये ताणाताणी झाली. बैठक वादाच्या दिशेने जात असल्याने नेत्यांनी ठरावांची पडताळणी थांबविली.
असे असेल संभाव्य जागावाटप
प्राथमिक जागावाटपासंदर्भात चर्चा करताना राष्ट्रवादी 9, शिवसेना शिंदे गटाने 7 आणि स्विकृत एक, भाजप 7 आणि स्विकृत, शासन नियुक्त एक, जनसुराज्यने दोन जागांसह अनुसुचित जाती गटातील जागा मागितली आहे. आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची एक जागा निश्चित आहे. महायुतीमधील घटक पक्षांची अशी अपेक्षा असून यावर मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.