Gokul Election : गोकुळच्या निवडणुकीला पुन्हा ‘ब्रेक’ लागणार? 1750 संस्थांचा फैसला होताच दोन्ही बाजूंनी कोर्टात जाण्याची तयारी

Kolhapur Gokul Milk Union Election Politics : कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघातील संस्था पात्र-अपात्रतेच्या वादावर आज निकाल लागणार आहे.
Kolhapur Gokul Election
Kolhapur Gokul ElectionSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या गोकुळ दूध संघातील संस्था पात्र-अपात्रतेच्या वादाचा आज अंतिम टप्पा गाठला जाणार आहे. प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या ४९५ हरकतींअंतर्गत तब्बल १७५० दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाली असून, या संस्थांच्या पात्र-अपात्रतेचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी गट, विरोधक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

मात्र, निकालानंतरही गोकुळची निवडणूक वादातून बाहेर पडण्याची शक्यता कमीच दिसत आहे. निकाल सत्ताधारी किंवा विरोधकांपैकी कोणत्याही बाजूने लागला, तरी त्याला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी दोन्ही गटांनी ठेवली आहे. त्यामुळे आजचा निकाल हा निवडणूक प्रक्रियेचा अंतिम टप्पा ठरण्याऐवजी नव्या कायदेशीर लढाईची सुरुवात ठरण्याची शक्यता आहे.

गोकुळची अंतिम मतदार यादी ४ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. त्यापूर्वी आजच्या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत तक्रारी, सुनावण्या, निकाल आणि त्याविरोधातील आव्हाने अशा सातत्याने सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे कोल्हापूरच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात वातावरण आधीच तापले आहे. आता आजच्या निकालानंतर या संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.

Kolhapur Gokul Election
Gokul Election: 'गोकुळ'ची निवडणूक बिनविरोध करण्याची महाडिकांची इच्छा; पण..., सांगितली मोठी अडचण

६७७ संस्थांचा निकाल तूर्तास प्रलंबित

दरम्यान, अवसायनातील संस्थांबाबत तत्कालीन दुग्ध निबंधक सुजय कदम यांनी दिलेल्या आदेशाशी संबंधित २१० दूध संस्था अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. या संस्थांच्या नावाने ठराव दाखल झाल्याने त्यावरही हरकती नोंदवण्यात आल्या आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी नारायण परजने यांनी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने संबंधित ६७७ संस्थांचा निकाल तूर्तास प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या संस्थांच्या पात्र-अपात्रतेबाबतचा निकाल जाहीर केला जाणार आहे. यातील ४१० संस्थांबाबत आज सहकार न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेत न्यायालयीन पेच कायम राहणार आहे.

१७५० पैकी १०७३ संस्थांचा निकाल आज शक्य

प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या ४९५ हरकतींच्या अनुषंगाने १७५० संस्थांची सुनावणी झाली आहे. त्यापैकी ६७७ संस्थांचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित १०७३ संस्थांच्या पात्र-अपात्रतेबाबतचा निकाल आज संबंधित संस्थांना पाठवला जाण्याची शक्यता आहे. या निकालामुळे अंतिम मतदार यादीत कोणत्या संस्थांना स्थान मिळणार आणि कोणत्या संस्था बाहेर पडणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

निकालानंतर पुन्हा न्यायालयीन लढाई?

आजचा निकाल जाहीर झाल्यानंतर गोकुळमधील संघर्ष संपण्याऐवजी आणखी वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या संस्थेला अपात्र ठरवण्यात आले किंवा पात्रतेवर आक्षेप घेतलेल्या पक्षाच्या विरोधात निकाल लागला, तर संबंधित गट न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत आहे.

सत्ताधारी संचालकांच्या बाजूने निकाल लागला तरी विरोधकांकडून आव्हान दिले जाऊ शकते आणि विरोधकांच्या बाजूने निकाल लागला तरी सत्ताधारी गट न्यायालयीन मार्गाचा अवलंब करू शकतो. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नारायण परजने यांच्या निकालावर पुढील काही दिवसांत कायदेशीर संघर्ष होण्याची शक्यता आहे.

६० दिवसांची मुदत; निवडणूक प्राधिकरणासमोर पेच

गोकुळची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत ६० दिवसांच्या आत घेण्याचे बंधन असल्याने सहकार निवडणूक प्राधिकरण आणि दुग्ध विभागासमोरही मोठा पेच निर्माण होऊ शकतो. एकीकडे अंतिम मतदार यादीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे, तर दुसरीकडे पात्र-अपात्र संस्थांचा वाद न्यायालयात गेला तर निवडणूक कार्यक्रमावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ४ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया वेगाने सुरू करायची की न्यायालयीन प्रकरणांमुळे पुन्हा अडथळे निर्माण होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

Kolhapur Gokul Election
Gokul election : गोकुळमध्ये मुश्रीफ-महाडिक वाद पेटला; महायुतीतून थेट भाजपलाच वगळण्याचा डाव, बड्या नेत्याचे प्रयत्न मुख्यमंत्री हाणून पाडणार?

गोकुळच्या निवडणुकीपूर्वी संस्था पात्र-अपात्रतेचा वाद निर्णायक टप्प्यावर पोहोचला असला, तरी आजच्या निकालानंतरही न्यायालयीन संघर्ष कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोकुळची निवडणूक नेमकी वेळेत होणार की पुन्हा कायद्याच्या कचाट्यात अडकणार, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com