
Kolhapur News, 19 Aug : 17 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंचचे उद्घाटन कोल्हापुरात पार पडले. तर प्रत्यक्षात सोमवारपासून कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गोकुळ दूध संघात चाललेल्या गैर कारभाराबाबत याचिका दाखल करण्यात आली.
या याचिकेत थेट गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव सहकारी दूध व्यावसायिक संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. दरम्यान, याबाबत पुढील सुनावणी 26 ऑगस्टला होणार आहे.
संचालक बेलवाडे यांनी सांगितले की, संस्थेचे ते संचालक असून, अध्यक्ष महादेव शिवणे यांच्यासह संचालकांनी ठराव करून याचिका दाखल करण्याचा ठराव केला आहे. त्यानुसार आज ही याचिका दाखल केली. महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे ‘डिव्हिजनल बेंच’ मध्ये ही याचिका दाखल झाली असून, लवकरच याचा क्रमांक मिळेल. मात्र, 26 ऑगस्टला पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.
'गोकुळ'च्या 2021 पासूनच्या गैरकारभाराबाबत संचालक शौमिका महाडिक यांनी दुग्ध विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर अहिल्यानगर येथील वर्ग एकचे शासकीय लेखापरीक्षकांकडे चाचणी आणि विशेष लेखापरीक्षण करण्याचे निर्देश दिले होते. 22 मे 2023 मध्ये लेखापरीक्षणामधील त्रुटी आणि दुरुस्ती अहवाल सादर झाला.
त्यानंतर 3 महिन्यांच्या आत दुरुस्ती करून त्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून आर्थिक नुकसानीची वसुली करणे क्रमप्राप्त होते. तसेच कायद्यातील तरतुदीनुसार संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त होणे अपेक्षित होते.'
ते पुढे म्हणाले, ‘शासनाच्या विशेष लेखापरीक्षणात दूध संघाने निविदा प्रक्रिया टाळून खरेदी करणे, वाढीव भावाने पशुखाद्य खरेदी करणे, मुंबईत वारेमाप जाहिराती करणे, खासगी व्यक्तींना डोनेशन देणे, मुंबईत करोडो रुपयांची जमीन खरेदी करताना रितसर प्रक्रिया न राबविता संशयास्पद व्यवहार करणे, अशा त्रुटी आढळल्या आहेत. 28 ऑगस्ट 2023 च्या उच्च न्यायालयाच्या निकालात निर्देश दिले होते.
'गोकुळ'ने कायद्यातील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केले नाही’ 'गोकुळ' संघ हा नेहमीच पारदर्शकतेच्या व कायद्याच्या चौकटीत राहून कारभार करणारा आहे. कायद्यातील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केलेले नाही. न्यायालयाने सांगितलेली प्रत्येक पूर्तता प्रामाणिकपणे केली आहे.' असा खुलासा 'गोकुळ'चे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी केला आहे.
वडकशिवाले येथील दूध संस्थेच्या संचालकांनी सर्किट बेंचमध्ये दाखल केलेल्या याचिकेबद्दल त्यांनी हा खुलासा केला. बेलवडे यांनी लेखापरीक्षणातील त्रुटींबाबत सांगितले की, "सात लाख सहा हजार 200 रुपये खासगी व्यक्तींना डोनेशन दिले आहे. याबाबत स्पष्टोक्ती नाही. कॅन दुरुस्तीची निविदा न काढता वाढीव दराने पुन्हा त्याच ठेकेदाराला काम दिले.
पशुखाद्याच्या कागल आणि गडमुडशिंगी येथील कारखान्यात कपडे धुण्याची निविदा न काढता काम दिले. मुंबई येथील दूध विक्रेत्यांच्या केबिन सजावटीसाठी प्रत्येकी 32 हजार रुपये दिले. दूध संघाच्या कर्मचारी पतसंस्थेला पाच कोटींचे खेळते भांडवल दिले आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.