Mumbai News, 19 Aug : नांदेड जिल्ह्यातील उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी बदली झाल्यानंतर खुर्चीवर बसून गाणे गायल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याच निलंबनाच्या कारवाईवरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशखेर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड जिह्यातील उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी शासकीय खुर्चीवर बसून गाणे गायले म्हणून जर या राज्यात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असेल तर अशा खुर्च्यांवर बसून पैसे खाणारे, लोकांचा छळ करणारे तलाठी, तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना बावनकुळे कोणती कठोर शिक्षा देणार आहेत? असा सवाल सामनातून उपस्थित केला आहे.
शिवाय तहसीलदारांचे गाणे ऐकले म्हणून या सर्व कर्मचाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई होणार आहे काय? तहसीलदारांवर गाणे गायल्याचा ठपका ठेवून निलंबन करण्याऐवजी कठोर शब्दांत समजही देता आली असती. तसे झाले नाही. बरे, हे सर्व कोठे घडत आहे तर महाराष्ट्रात? ज्या राज्यात सध्या सर्वात जास्त राजकीय व प्रशासकीय बेशिस्त, बजबजपुरी माजली आहे.
भ्रष्ट, व्यभिचारी मंत्र्यांना शिस्त लावण्याची, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची हिंमत ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यात नाही, त्या राज्यात सरकारी अधिकाऱ्याने गाणे म्हणणे हा अपराध ठरला आहे. महाराष्ट्राचे चार मंत्री हनी ट्रपमध्ये फसले आहेत. त्यांच्यावर कारवाई नाही. एक मंत्री विधानसभेत ‘रमी’चा डाव टाकतो. त्याला मुख्यमंत्र्यांनी अभय दिले.
एक मंत्री पैशांच्या बॅगा उघडून ‘चड्डी-बनियन’वर सिगारेटचे झुरके मारताना दिसतो. खून, विनयभंग, भ्रष्टाचार करून अनेक मंत्री फडणवीस यांच्या सरकारात नांदत आहेत. त्या सर्व लाडक्या भावांना हात लावण्याची हिंमत राज्यकर्त्यांमध्ये दिसत नाही, पण निरोप समारंभात एका तहसीलदारांनी गाणे गायले म्हणून त्यांना सरकारी सेवेतून निलंबित केले गेले.
खरे तर महसूल खात्यात सर्वात जास्त भ्रष्टाचार बोकाळला आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत महसूल आणि पोलीस खाते नेहमीच आघाडीवर राहिले. जनसामान्यांचा सर्वाधिक संबंध असलेली ही दोन खाती आहेत व तेथे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार आहे. फडणवीसांचे राज्य आले म्हणून राज्यातील भ्रष्टाचार थांबला असे घडले नाही.
उलट तो वाढतच चालला आहे. भरतीपासून टेंडरपर्यंतच्या घोटाळ्यांनी महाराष्ट्रात शिखर गाठले आहे. मात्र नांदेड जिल्ह्यातील उमरीच्या तहसीलदारांनी शासकीय खुर्चीत बसून गाणे म्हटल्याने शिस्तभंग झाला हे अजबच आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याची शिस्त बिघडली असे जे म्हणतात त्यांचेच संतुलन सर्वच बाबतीत बिघडले आहे.
ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी गायिका आहेत, त्या राज्यातील सरकारी अधिकारी कार्यालयात गाणे गायला हा कठोर अपराध ठरू नये. तहसीलदारांनी कार्यालयात नंगा नाच घातला नाही, गोंधळ केला नाही, डाके-दरोडे टाकले नाहीत, लोकांना छळले नाही. फक्त गाणेच गायले ना? बावनकुळे जाऊ द्या हो, या चुकीला माफी असायलाच हवी, असं सामनामध्ये म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.