Kolhapur News, 03 Apr : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र लढलेल्या महायुतीमध्ये गोकुळच्या निवडणुकीवरून आतापासूनच अंतर्गत धुसफूस झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी एकमेकाला शह कटशह देण्याची स्पर्धा नेत्यामध्ये लागली आहे. एकीकडे जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांना काही संचालकांच्याआडून ही निवडणूक बिनविरोध करायची आहे.
तर काही नेत्यांना विशिष्ट नेत्यांचा सहभाग नको आहे. त्यामुळे महाडिक गटाला वगळून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संचालकांची पळापळ सुरू आहे. पडद्यामागून सुरू असलेल्या हालचालीमुळे महाडिक गट चांगलाच दुखावला गेला आहे. मागील 48 तासाच्या कालावधीत गोकुळ दूध संघाच्या सभासदांबाबत चौकशीचे आदेश व अधिकाऱ्यांची झालेली तडकाफडकी बदली हेच गोकुळच्या निवडणुकीवरून सुरू असलेले महायुतीमधील अंतर्गत राजकारण स्पष्ट करते.
गोकुळ दूध संघाच्या मागील निवडणुकीत महाडिक गट वगळता सर्वच जिल्ह्याचे नेते एकत्र येत पंचवीस वर्षाची महाडिक गटाची सत्ता उलथवून टाकली. काँग्रेस नेते सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची आजही गोकुळ मधील गट्टी कायम आहे. मात्र राज्यातील राजकारणाची समीकरणे जशी बदलली तसे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली गेली. त्यामुळे आता सतेज पाटील यांच्या विरोधात मंत्री मुश्रीफ यांच्यासह सर्वच महायुतीचे नेते आहेत.
पर्यायाने महाडिक गट देखील भाजपमध्ये असल्याने सध्या गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून लढण्याचे धोरण ठरले आहे. सुरवातीला ‘गोकुळ’ ची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवली जावी यासाठी भाजपचे आणि त्यातही महाडिक गटाचे प्रयत्न सुरू होते. पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले.
‘गोकुळ’ च्या अवसायानात काढलेल्या संस्था वगळाव्यात म्हणून न्यायालयात ज्यांनी याचिका दाखल केली, त्यांना महाडिक गटाचे बळ असल्याची चर्चा आहे. यामागे असलेल्या अद्श्य शक्ती कोण? असा प्रश्नही संघाचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी अलिकडेच विचारला होता. तथापि या संस्थांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्यात शौमिका महाडिक ह्या महाडिक गटाच्या संचालिकाही आघाडीवर होत्या. पण खरी शक्ती कोण असा प्रश्न उपस्थित होतो. याच संस्थांवरून महाडिक गटाला ‘टार्गेट’ करण्याचे प्रयत्न सुरू होते.
महाडिक यांना वगळूनच ‘गोकुळ’ ची निवडणूक लढवायची अशा हालचाली सुरू होत्या. त्यातूनच काही संचालकांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली. तर काँग्रेस नेते सतेज पाटील यांची भेट देखील नियोजित होती. संचालकांच्या या प्रयत्नानंतर महाडिक गटाला कोणतीच विचारणा झालेली नाही. त्यामुळे महाडिक गट दुखावला गेला आहे.
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी भाजपला वगळून कोणतीच निवडणूक घेता येणार नाही असा स्पष्ट इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या राजकारणात एकाच दिवशी गोकुळ मध्ये दोन धक्कादायक घटना घडल्या. 31 मार्च रोजी वाढीव सभासदांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. त्याला 24 तास उलटताच या प्रक्रियेत महत्वाची भुमिका बजावत असलेले उपनिबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांच्या बदलीचे आदेश धडकले.
तक्रारदाराने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यातून मुख्यमंत्री फडणवीस यांनीच यात हस्तक्षेप केल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान जी अदृश्य शक्ती या तक्रारदारांच्या मागे आहे ती नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याचे स्पष्ट होते. कारण 24 तासात अधिकारी बदलीचे आदेश निघणे आणि चौकशी लागणे यातून ‘गोकुळ’ च्या राजकारणात भाजप आणि पर्यायाने महाडिक यांना वगळून काही चालणार नाही असाच संदेश या कारवाईतून दिल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.