
Summary :
९ सप्टेंबर रोजी गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून सर्वांचे लक्ष या सभेकडे लागले आहे.
लेखापरीक्षण अहवाल, जाजम व घड्याळ खरेदीसारख्या मुद्द्यांवर सभेत चर्चा तापली आहे.
सभासदांच्या प्रश्नांना सत्ताधाऱ्यांकडून उत्तर कसे दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. त्याआधी होणाऱ्या 9 सप्टेंबर रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि दूध उत्पादक शेतकरी सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे. गोकुळ दूध संघात परिवर्तन झाल्यानंतर मागील पाच वर्षाचा कालावधी पाहता विविध मुद्द्यांवरून गोकुळ दूध संघ चर्चेत राहिला. पण लेखापरीक्षण अहवालासह जाजम आणि घड्याळ खरेदीवरचा मुद्दा वार्षिक सभेदरम्यान चांगलाच तापला आहे. त्यातच 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक सभासद आणि संस्थांकडून गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना एक प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे सत्ताधऱ्यांकडून या सर्व प्रश्नांना लेखी उत्तर द्यावे लागणार आहे. लेखा परीक्षणासह अनेक मुद्द्यांवर संस्था सभासदांनी लक्ष केंद्रित केल्या आहे. त्यामुळे गोकुळच्या सत्ताधाऱ्यांची झोप उडणार आहे. मात्र येणाऱ्या 9 सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधार्यांकडून या सर्व प्रश्नांना कशा पद्धतीने उत्तर दिले जाणार हे देखील पाहावे लागणार आहे.
राज्यात महायुतीचे सरकार येण्यापूर्वी गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक यांनी विरोधकांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर गोकुळच्या कारभारावर वचक ठेवण्यास मर्यादा आल्या. पण आता संस्था सभासदांकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे आता थेट सत्ताधाऱ्यांना द्यावी लागणार आहेत.
या प्रश्नांची द्यावी लागणार उत्तर :
1) अहवालानुसार दूध संकलनापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संकलन किती आणि जिल्ह्याबाहेरील किती? याची गाय व म्हैस दूध असे वर्गीकरण करून आकडेवारी द्यावी.
2) संघाने मागील पाच वर्षांत म्हैस दूध वाढीसाठी एकूण किती रुपये खर्च केले? तसेच त्या अंतर्गत राबवलेल्या उपक्रमांचा संघाला कितपत फायदा झाला, याची माहिती मिळावी.
3) संघाकडे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला दूध भुकटी व लोणी यांचा किती स्टॉक उपलब्ध होता? त्यामध्ये चालू आर्थिक वर्षात किती वाढ झाली? त्यापैकी दूधनिर्मितीसाठी हाताळणी किती झाली? संपूर्ण स्टॉकचा निर्मिती खर्च किती? तसेच जर अहवाल सालाच्या अखेरीपर्यंत या उपपदार्थांची विक्री झाली असेल तर ती कोणास व किती दराने झाली? दर अंतिम करण्यापूर्वी संघाने कोणते निकष लावले, याची सविस्तर माहिती द्यावी.
4) संघाकडे एकूण पाच शीतकरण केंद्रांमध्ये दूध हाताळणी केली जाते. या प्रत्येक शीतकरण केंद्राकडे कोणकोणते संकलनाचे रूट आहेत? त्यामध्ये जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील रूट कोणते? तसेच त्या प्रत्येक रूटवरील सरासरी वार्षिक संकलन किती, याची माहिती मिळावी.
5) अहवाल सालामध्ये संघाकडून दूध संस्थांना किती लिटर वासाचे दूध परत करण्यात आले? याची आकडेवारी मिळावी. आणि जर एखाद्या शासकीय नियमानुसार किंवा कायद्यानुसार वासाचे दूध परत करता येत नसेल, तर तो कायदा कोणता आहे व किती सालापासून अस्तित्वात आहे, याची माहिती द्यावी.
6) दूध भेसळ रोखण्यासाठी संघाकडून अहवाल सालामध्ये किती वेळा दुधाची तपासणी अथवा परीक्षण करण्यात आले? त्यानुसार किती लिटर दुधामध्ये भेसळ आढळून आली? याची आकडेवारी व तपासणीचे/परीक्षणाचे अहवाल शीतकेंद्रनिहाय सादर करावेत. तसेच पुढील काळात भेसळ रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहे, याची माहिती द्यावी.
7) संघाच्या जाहिरात खर्चामध्ये वर्षानुवर्षे वाढ होताना दिसत आहे. सदर जाहिराती कोणकोणत्या संस्थांमार्फत दिल्या जातात? कोणत्या जाहिरातीसाठी किती खर्च केला जातो? याची सविस्तर बिले, विवरण व कारणासह माहिती द्यावी.
8) संघाच्या वाहतूक खर्चामध्ये प्रत्येक आर्थिक वर्षात वाढ होत आहे. ही वाढ कशामुळे होते? तसेच सध्या दूध वाहतूक ठेका देण्यात आलेल्या संस्था व व्यक्ती यांची नावे आणि वाहतुकीचा ठेका देत असतानाचा अंतिम दर किती आहे, याची माहिती द्यावी.
9) मागील पाच वर्षांत म्हैस दुधाच्या विक्री दरामध्ये किती वाढ करण्यात आली? खरेदी दरामध्ये किती वाढ करण्यात आली? त्या वाढीचा दर व तारीख याचा सविस्तर आलेख द्यावा. त्याच पद्धतीने गाय दुधाच्या विक्री दरामध्ये व खरेदी दरामध्ये किती वाढ करण्यात आली, याची माहिती द्यावी.
10) संघाला 'अ' वर्ग सभासद संस्थांकडून होणाऱ्या दूध पुरवठ्याची मागील पाच वर्षांची माहिती द्यावी. ही माहिती वर्षनिहाय असावी. त्यामध्ये 2021 पूर्वी सभासद असणाऱ्या संस्थांकडून होणारा पुरवठा व नव्याने सभासद झालेल्या संस्थांकडून होणारा पुरवठा असे वर्गीकरण असावे.
11) 2022-23 मध्ये शासनाकडून संघाचे चाचणी लेखापरीक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल शासनास सादर झाल्यानंतर त्यामध्ये संघाच्या कारभारावर अनेक ताशेरे ओढण्यात आलेले दिसतात. तरीही त्याची दोषदुरुस्ती शासनास का सादर करण्यात आली नाही? तसेच त्यानंतरच्या दोन वार्षिक सभांमध्ये सभासदांसमोर हा अहवाल किंवा दोषदुरुस्ती मंजुरीसाठी का ठेवली गेली नाही? याचा उल्लेख संघाच्या वार्षिक सभेच्या सूचनेमध्ये का आढळून येत नाही?
12) गतवर्षीच्या तुलनेत संघाच्या पशुखाद्य कारखान्याचा व्यापारी नफा जवळपास चार कोटींनी वाढला आहे. मात्र निव्वळ नफा 51 लाखांवरून घटून एक लाख 86 हजारांवर आला आहे. हा विरोधाभास का दिसतो? तसेच पशुखाद्य कारखान्याच्या नफा-तोटा पत्रकात 'एनडीडीबी व मुख्यालय व्याज' या शीर्षकाखाली चार कोटींपेक्षा अधिकची वाढ दिसते. हे वाढीव व्याज कोणत्या कारणासाठी आकारले आहे, याची माहिती मिळावी.
13) संघाने हीरकमहोत्सवी खर्चासाठी रुपये चार कोटींची मागणी केली आहे. या पैशांचा विनियोग नेमका कसा केला जाणार आहे? किंवा यापूर्वीच केला असल्यास कोणत्या वस्तू खरेदी केल्या? त्या वस्तूंची संख्या किती? कोणाकडून खरेदी केल्या? कोणत्या दराने खरेदी केल्या, याची माहिती मिळावी.
14) वार्षिक सभेपूर्वी सभासद संस्थांना जाजम व घड्याळे भेटवस्तू स्वरूपात देण्यात आली. या खरेदीसाठी एकूण किती रक्कम खर्च करण्यात आली? ही खरेदी सहकार कायद्यानुसार राबवली गेली का? सदर खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली होती का? निविदा प्रसिद्ध न करता खरेदी केली असल्यास कोणाच्या अधिकारात ही खरेदी करण्यात आली? जाजम व घड्याळ पुरवठा करणाऱ्या संस्था/व्यक्तीचे नाव व खरेदीचा अंतिम दर किती, याची माहिती द्यावी.
15) संघाच्या पशुखाद्य वाहतुकीचा ठेका सध्या कोणत्या संस्थेकडे आहे? ठेका देत असताना अंतिम दर किती ठरविण्यात आला? सध्याचा वाहतूक दर व 2021 सालचा वाहतूक दर याचा तुलनात्मक तक्ता सादर करावा.
16) संघाकडे सध्या 514 रूटवरून दूध संकलन केले जाते. या रूटवरील प्रत्येक वाहनाची क्षमता किती आहे? त्यांना दिला जाणारा वाहतुकीचा दर क्षमतेनुसार किती आहे? आणि प्रत्यक्षात त्या वाहनातून किती लिटर दुधाची वाहतूक झाली, याची माहिती द्यावी.
17) चालू आर्थिक वर्षामध्ये लोणी व भुकटी या उपपदार्थांची विक्री झाली असल्यास ती कोणत्या दराने केली? नंतर आवश्यकतेनुसार ही उपपदार्थे पुन्हा खरेदी केली असल्यास कोणाकडून व किती दराने खरेदी केली, याची माहिती द्यावी.
18) पुणे येथे पॅकेजिंग केल्यानंतर दूध विक्रीसाठी पाठवत असताना जर अंतर 100 किलोमीटरपेक्षा अधिक असेल तर वाहतुकीसाठी वाढीव दर देण्याची परवानगी आहे. असे धोरण असूनही किकवी येथून पॅकेजिंग केल्यानंतर पुणे शहरात विक्रीसाठी पाठवल्या जाणाऱ्या दुधासाठीही वाढीव दर दिला जातो, अशी माहिती आहे. त्यामुळे किकवी येथे किती दूध पॅकेजिंग केले जाते? ते विक्रीसाठी कुठे पाठवले जाते? त्या वाहतुकीसाठी कंत्राटदारास वाढीव किती दर दिला जातो व कधीपासून दिला जातो, याची माहिती द्यावी.
19) बजेट पत्रकानुसार अहवाल सालात किरकोळ सभा व समारंभांसाठी संघाने 1 कोटी रुपये खर्च केलेला आहे. हा खर्च कोणकोणत्या सभा व समारंभांवर झाला? प्रत्येक सभेला व समारंभाला किती खर्च झाला? तसेच कोणत्या बाबींवर किती खर्च करण्यात आला, याची माहिती द्यावी.
20) सन 2021 पर्यंत संचालक मिटिंग भत्ता चार लाख रुपये होता आणि प्रत्यक्ष खर्च तीन लाखांच्या आत होता. हा खर्च दरवर्षी वाढत आहे. चालू वर्षाच्या अहवालानुसार तब्बल 13 लाख 30 हजार रुपये संचालक मंडळ मिटिंगसाठी खर्च झाले आहेत. अहवाल सालात एकूण किती संचालक मंडळ मिटिंग झाल्या? आणि नेमका कोणत्या बाबींवर इतका खर्च झाला, याची माहिती द्यावी.
21) सन 2021 पर्यंत संचालक मिटिंग, प्रवास व प्रशिक्षणासाठी 30 लाख रुपये मंजूर केले जायचे. सरासरी प्रत्यक्ष खर्च 20 लाख रुपये इतका होता. चालू अहवाल सालात हा खर्च 55 लाख रुपयांवर पोहोचला आहे. पाच वर्षांत खर्चातील वाढीचे प्रमाण साधारण तिप्पट आहे. इतकी वाढ कशामुळे झाली? तसेच हे 55 लाख रुपये कधी व कोणत्या कारणासाठी खर्च झाले, याची माहिती द्यावी.
22) अहवाल सालात संघाकडून रुपये 1 कोटी 26 लाख खर्च करून पशुधनासाठी आयुर्वेदिक हर्बल उत्पादनांचा कारखाना उभारला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत या उत्पादनांच्या वापरामुळे दुधाची गुणवत्ता सुधारल्याचे नमूद केले आहे. मात्र प्रत्यक्षात अहवाल सालातील म्हैस व गाय दुधाची सरासरी गुणप्रत 2018-19 या वर्षांच्या तुलनेत समान किंवा त्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे प्रकल्पाची उपयुक्तता व उद्दिष्टांबाबत शंका निर्माण होते. तसेच या उत्पादनांचा वापर वाढल्यामुळे अॅलोपॅथिक औषधांचा वापर कमी झाल्याचे नमूद आहे; पण प्रत्यक्षात औषधोपचार खर्चात वाढ झालेली दिसते. याचे कारण स्पष्ट करावे.
23) संघाच्या स्लरी प्रोसेसिंग प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या उत्पादनांची संख्या व विक्री कमी आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी संघाने किती खर्च केला? तिथे किती कर्मचारी कार्यरत आहेत? त्यांचा पगार, प्रकल्पाचा मेंटेनन्स खर्च आणि उत्पन्न किती? प्रकल्प फायद्यात आहे की तोट्यात, याची माहिती द्यावी.
24) क्लस्टर बल्क कुलरमध्ये संकलित होणाऱ्या दुधामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील दुधाचे प्रमाण व गुणप्रत किती? या दुधासाठी दिला जाणारा दर जिल्हानिहाय किती आहे, याची माहिती द्यावी.
25) अहवाल सालात संघाकडे संकलित झालेल्या म्हैस व गाय दुधापैकी एकूण किती लिटर दूध दुय्यम प्रतीचे ठरवले गेले? सदर आकडेवारी शीतकरण केंद्र, क्लस्टर व बीएमसीनिहाय द्यावी. तसेच या दुय्यम प्रतीच्या दुधाला काय दर देण्यात आला, याची माहिती द्यावी.
प्र.१: गोकुळ दूध संघाची वार्षिक सभा कधी होणार आहे?
उ. ९ सप्टेंबर २०२५ रोजी ही सभा होणार आहे.
प्र.२: सभेत कोणते मुद्दे चर्चेत आहेत?
उ. लेखापरीक्षण अहवाल, जाजम खरेदी, घड्याळ खरेदी आणि सत्ताधाऱ्यांवरील प्रश्न हे मुख्य मुद्दे आहेत.
प्र.३: सभासदांचे लक्ष का वेधले गेले आहे?
उ. येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यावे लागणार असल्यामुळे सभासदांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.