Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे (BJP) खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय वाद राज्याला सर्वश्रुत आहे. त्यांच्यातील टोकाचा संघर्ष अनेक वेळा समोर आला आहे. दोघांमधील वाद अनेक वेळा कार्यकर्त्यांनी देखील एकमेकांच्या अंगावर घेतला आहे. जसा नेत्यांमधील वाद तसाच गटातटाचा वाद दक्षिण मधील प्रत्येक गावात दिसतो. मात्र, त्याला छेद देत चिंचवाड ग्रामपंचायत निवडणुकीत हे दोन एकत्र आले. मात्र, वैतागलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल देत बंटी व मुन्नांच्या गटाला झिडकारले आहे.
कोल्हापुरात महायुतीने ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, सगळ्यात लक्षवेधी ठरली ती म्हणजे करवीर तालुक्यातील चिंचवाड ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीने धक्कादायक निकाल देत जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी दिली आहे. या निवडणुकीत आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या गटाने एकत्र येत युती केली. दक्षिणच्या राजकारणात कधीही एकमेकांचे तोंडं न पाहणाऱ्या गावाच्या पुढऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन युती केली.
मात्र, ग्रामस्थ मतदारांना ही गोष्ट पटली नाही. गावच्या करभाऱ्यांच्या सोयीच्या राजकारणाला ग्रामस्थांनी नाकारले. अपक्ष पॅनललाच गावचा कारभारी म्हणून निवडून दिले आहे. असा धक्कादायक निकाल समोर येताच अपक्ष कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणीच जल्लोष साजरा केला.
गावच्या कारभाऱ्यांच्या विरोधात एकत्र येऊन स्थानिकांनी प्रत्येक वार्ड मधून अपक्ष उमेदवार उभा केला. या ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 12 उमेदवार आणि एक सरपंच पदाचा असे मिळून 13 उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. खरेतर आमदार सतेज पाटील आणि महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात एकत्र येत अभद्र युती केली. गावच्या कारभाऱ्यानी सोयीचे राजकारण केल्याने गाव पेटून उठला. त्यामुळे अपक्षांचे पॅनल उभारून अभद्र युतीला जोरदार टक्कर दिली. 12 पैकी आठ जागांवर अपक्षाने बाजी मारली. तर सरपंच पदावर देखील पाटील व महाडिक गटाच्या कोळी यांचा पराभव करून श्रद्धा पोतदार यांनी विजय मिळवला. या निकालानंतर नेत्यांच्या आणि त्यांच्या करभाऱ्यांच्या सोयीच्या राजकारणाला चपराक दिली असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
चिंचवाड ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल येताच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मिश्किल भाषेत यावर भाष्य केला आहे. या दोन गटाचे एकत्र येणे म्हणजे जिल्ह्यातील राजकारणात शुभ संकेत म्हणावे लागेल. अशा शब्दात त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर दक्षिण मधून काय निर्णय येईल हे चिंचवाड निर्णयावरून दिसत आहे. एकतर्फी निकाल चिंचवाडच्या नागरिकांनी लावला आहे. विधानसभेत तिथे भाजपचाच उमेदवार निवडून येईल. चिंचवाडमध्ये आमच्या विचारांचे लोक निवडून आलेले आहेत, असे महाडिक म्हणाले.
काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यात वाद असून राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी आहेत. मात्र, स्थानिक राजकारणात दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी गावावर सत्ता गाजवायला सुरुवात केली होती. मात्र, या पुढार्यांना चिंचवाड मधील जनता कंटाळली. त्यांनी सर्वसामान्य अपक्ष उमेदवारांना कौल दिला. यातून चिंचवाड ग्रामपंचायत निवडणुकीत सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांना नाकारल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सोयीच्या राजकारण कराल तर मतदार राजाला गृहीत धरू नका, असाच इशारा या गावाने नेत्यांना दिलाय हे मात्र नक्की.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.