Baramati LokSabha News : बारामती लोकसभा लढण्याचा शिवतारेंचा दावा फोल ठरणार ? महायुतीच्या जागावाटपाकडे लक्ष

Baramati Politics : भाजप ही जागा मित्र पक्षाला सोडणार का ?
Vijay Shivtare, Supriya Sule News
Vijay Shivtare, Supriya Sule NewsSarkarnama
Published on
Updated on

Baramati Lok Sabha Constituency : सर्वपक्षीय नेते तसेच कार्यकर्त्यांनी जर मला सांगितले तर बारामती लोकसभेची निवडणूक लढविण्यास मी तयार आहे, अशी तयारी शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी वर्षभरापूर्वी दर्शवली होती. मात्र, आता वर्षभरानंतर राज्यातील संपूर्ण चित्रच बदलले आहे. पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अजित पवार गट सत्ताधारी महायुतीमध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळे आता बारामती लोकसभा निवडणुकीत कोण रिंगणात उतरणार याकडे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामतीची जागा ही भाजपची (BJP) हक्काची जागा आहे. त्यामुळे भाजप ही जागा मित्र पक्षाला सोडणार का ? अन् सोडली तर ती अजित पवार गटाला जाणार की शिंदे गटाला यावर येथील समीकरण अवलंबून असणार आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दाखवलेली तयारी मात्र आता फोल ठरणार असे दिसते. या पूर्वीच अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा निवडणुकीत हिसका दाखविल्याने विजय शिवतारे यांना पराभव स्वीकारावा लागला होता, हेदेखील विसरून चालणार नाही.

Vijay Shivtare, Supriya Sule News
Ajit Pawar : अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाची वाट आणखी किती खडतर...?

बारामती लोकसभा मतदारसंघातील आगामी लढत नुरा कुस्ती होऊ नये, यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच पक्षांकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली असली तरी सर्वच इच्छुकांना वाट पाहावी लागणार आहे. ''बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोण्या एका परिवाराचा सात बारा नाही, येथील जनतेनेच निश्चय केला तर निश्चितपणे या मतदारसंघातही परिवर्तन होऊ शकते, परिवारवाद असलेले पक्ष संपुष्टात आले पाहिजे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका योग्य असून, आगामी निवडणुकीत हे चित्र दिसेल, असेही वर्षभरापूर्वी बोलताना विजय शिवतारे म्हणाले होते. मात्र, आता मतदारसंघातील चित्र बदलले आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी रासपच्या महादेव जानकर यांनी केली आहे. २०१४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली होती. या वेळी त्यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कडवी झुंज दिली होती. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते. त्यांनी पण सुप्रिया सुळे यांना चांगली लढत दिली. विशेषतः महायुतीकडून ही जागा टार्गेट करण्यात आली होती.

2024 च्या निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील चित्र बदलले आहे. गेल्या दोन वर्षांत महविकास आघाडीला दोन धक्के बसले. पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) फोडून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांचा गट भाजपसोबत आला तर दुसऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार यांच्यासह ४० आमदारांचा गट महायुतीमध्ये आला. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील चित्र आता पूर्णपणे बदलले आहे.

महायुतीच्या जागावाटपात बारामतीची जागा महायुतीमध्ये कोणाला सुटणार यावर उमेदवार ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला जागा सुटली तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे भाजपला जागा सुटली तर पुन्हा कांचन कुल, महादेव जानकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाऊ शकते. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला जागा सुटली तर माजी मंत्री विजय शिवतारे निवडणूक लढवू शकतात. मात्र, अजित पवार यांचा पूर्वानुभव पाहता त्यांच्या सहमतीशिवाय येथील उमेदवार ठरणार नाही. त्यामुळे विजय शिवतारे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता कमी आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Vijay Shivtare, Supriya Sule News
Gram Panchayat Election Results: ग्रामपंचायत निकालाचा परिणाम लोकसभा, विधानसभांवर होणार नाही ! 'हे' आहेत तीन कारणं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com