Kolhapur News : . महापुराचे गंभीर संकट कोल्हापूर शहरासह परिसरावर आहे. पण अशा परिस्थितीत पालकमंत्री या नात्याने या संकटावर मात करण्यासाठी जिल्ह्यात असणे आवश्यक आहे. पण ते अशा परिस्थितीतही आपल्या कार्यकर्त्यांसह तुळजापूरला दर्शनासाठी गेल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.पण देवदर्शनानंतर मुश्रीफ आता 'अॅक्शन मोड'वर आले असून कोल्हापुरातील 'पूर'संकटावर मात करण्यासाठी प्रशासनासह मैदानात उतरले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला वेळोवेळी आलेल्या पुराचा अनुभव असून पाणी कोणत्या भागात आल्यानंतर पूरस्थिती निर्माण होते याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता नदीची पाणीपातळी व पूरपरिस्थिती पाहून सुरक्षित ठिकाणी वेळेत स्थलांतरित होवून प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी शुक्रवारी (ता.26) सायंकाळी कोल्हापुरात येताच पूरग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांना आधार दिला. दरम्यान, प्रशासन आपल्या पाठीशी ठाम असून घरांची पडझड, दुकाने, टपऱ्या, शेती आदींचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाच्या निकषानुसार तातडीने मदत देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ दिले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर (Kolhapur) शहरातील सुतारवाडा, कुंभार गल्ली, जामदार क्लब येथील पूरबाधित भागाला तसेच चित्रदुर्ग मठ निवारागृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, साधारण दर दोन वर्षांनी नेहमीच पूरस्थिती निर्माण झालेली आपण पाहिलेली आहे. त्यामुळे आता पाणी पातळी पाहून नागरिकांनी स्वतःहून निर्णय घेऊन स्थलांतरीत व्हावे. या प्रक्रियेत प्रशासनाकडून ठिकठिकाणी निवारागृहांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक दाखल झाले असून आणखी एक पथक उद्या दाखल होणार असल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली.
अतिवृष्टी आणि धरणातून होणारा विसर्ग आणि त्यामुळे वाढत जाणारी नदीची पाणी पातळी व पूर परिस्थितीचा विचार करुन नागरिकांचे वेळेत स्थलांतर करा. कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्या. स्थलांतरीत नागरिकांना चहा, नाश्ता, भोजन, औषधे व अन्य सोयी -सुविधा वेळेत पुरवा, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आपत्ती व्यवस्थापन नियोजनाबाबत बैठकीत दिल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली असल्यामुळे शहर व ग्रामीण भागात शेतीत व रहिवासी वस्तीत देखील पुराचे पाणी गेले आहे. जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे घरांची पडझड, दुकाने, टपऱ्या, शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाच्या निकषानुसार तातडीने मदत देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. यासाठी नुकसानग्रस्त भागाचे वेळेत पंचनामे करावेत, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.