

Karad, 18 September : कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत कराड उत्तरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार मनोज घोरपडे व विधान परिषद सदस्य धैर्यशील कदम यांचे समर्थक आणि कारखान्याचे अध्यक्ष, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे सभास्थळी तणावाची परिस्थिती होती. एकीकडे गोंधळ सुरू असताना अध्यक्ष, माजी मंत्री पाटील यांनी आपले भाषण सुरूच ठेवून काही वेळातच विषय मंजूर झाल्याचे जाहीर केले.
दरम्यान, भाजपच्या दोन आमदारांनी कारखान्याच्या गेटवरच समांतर सभा घेत सत्ताधारी पाटील गटाचा निषेध केला, तर सत्ताधारी पाटील यांनी विरोधकांनी सभा उधळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सह्याद्री कारखान्याच्या कार्यस्थळी मोठ्या तणावाची परिस्थिती होती.
कऱ्हाडमधील (ता. कराड जि. सातारा) यशवंतनगर येथील सह्याद्री साखर कारखान्याची आज ५४ वी वार्षिक सभा होती. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला भाजपचे आमदार मनोज घोरपडे आणि आमदार धैर्यशील कदम आपल्या समर्थकांसह यशवंतनगर येथे सभास्थळी आले.
भाजपचे आमदार सभेच्या ठिकाणी येताच कारखान्याचे अध्यक्ष सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील गटाचे समर्थक आणि भाजप आमदार घोरपडे व कदम यांच्या समर्थकात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. काही काळ घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे सभास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मोफत साखर वाटपाच्या मुद्यावरून सुरू झालेला वाद पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. गोंधळ सुरू असतानाही आमदार मनोज घोरपडे व आमदार धैर्यशील कदम सभास्थळी थांबून राहिले होते. याचदरम्यान कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे भाषण सुरू ठेवले होते.
दरम्यान, सभा सुरू असताना आणि अध्यक्ष बोलत असताना दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी सुरू होती, त्यामुळे सभास्थळी मोठ्या तणावाची परिस्थिती निर्माण झाला होता. काही वेळानंतर विद्यमान अध्यक्ष पाटील यांनी ठराव मंजूर झाल्याचे जाहीर करून सभा संपल्याचे जाहीर केले.
अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी गोंधळातही आपले भाषण चालूच ठेवून सभा रेट्याचा प्रयत्न केला. पण गोंधळातही आमदार घोरपडे व कदम सभास्थळी थांबून राहिले. पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील यांनी मध्यस्थी करत आमदार घोरपडे व आमदार कदम त्यांना सभास्थळापासून दुसरीकडे जाण्याची विनंती केली. पण कदम आणि घोरपडे यांनी त्यास नकार देत सभास्थळीच थांबून राहिले.
काही काळानंतर आमदार घोरपडे व कदम हे सभास्थळापासून कारखान्याच्या मुख्य गेटवर गेले. त्या ठिकाणी त्यांनी समांतर सभा घेत कारखान्याच्या सभेत झालेल्या प्रकाराचा निषेध नोंदवला. तर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी विरोधकांनी सभा उधळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.