

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण जाहीर झाल्यानंतर बहुतांश प्रभागातील चित्र स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून देव पाण्यात ठेवून बसलेल्या इच्छुकांनी आरक्षण सोडतीनंतर फटाके फोडून तर जल्लोष करत आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची सलामी दिली. काही ठिकाणी कारभाऱ्यांची नाराज झाले असले तरी आपल्या सौभाग्यवतींना मैदानात उतरवण्याची तयारी ठेवली आहे. महापालिकेतील वीस प्रभागात बहुतांश ठिकाणी एक प्रवर्ग खुला झाल्याने यातूनच इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळणार आहे. अशातच कारभाऱ्यांचे वारसदार यंदा महापालिकेच्या निवडणुकीत शड्डू ठोकणार आहेत.
2015 च्या महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर 2020 नंतर प्रशासक काल सुरू झाला. तब्बल साडेचार वर्षांपासून निवडणुकीची प्रतीक्षा केल्यानंतर जानेवारीच्या अखेरपर्यंत महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. गेल्या दहा वर्षाच्या काळात अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागात वातावरण निर्मिती केली आहे.
2020 मध्येच महापालिकेची निवडणूक होईल ही आशा घेऊन उतरलेल्या इच्छुकांची कोरोनामुळे निराशा झाली. त्यानंतर ओबीसी आरक्षणावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर तब्बल साडेचार वर्ष निवडणूक लांबणीवर पडली. आता मात्र याच कारभाऱ्यांचे आणि इच्छुक उमेदवारांचे वारसदार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. आरक्षणानंतर जवळपास हे चित्र स्पष्ट झाले आहे.
आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव, माजी महापौर सुनील कदम, माजी महापौर सई खराडे, महापौर दीपक जाधव, माजी नगरसेवक संभाजी जाधव, उत्तम कोराणे, किरण शिराळे, संभाजी जाधव, मधुकर रामाने, सुजित चव्हाण, माजी नगरसेविका दीपा मगदूम, यांचे वारसदार रिंगणात असणार आहेत तर माजी नगरसेवक खंडू कांबळे यांचे पुतणे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
आमदार राजेश क्षीरसागर यांचे मोठे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर हे प्रभाग क्रमांक सात मधून महापालिकेच्या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. 2009, 2014 आणि 2024 अशा तीन वेळा वडील आमदार राजेश क्षीरसागर हे आमदार आहेत. शिवाय या तिन्ही निवडणुकीत ऋतुराज क्षीरसागर हे प्रचारात आघाडीवर होते. सर्वसामान्य मतदारांमध्ये ते परिचित आहेत. शिवाय यंदा प्रभाग क्रमांक 7 त्यांच्यासाठी सेफ समजला जातो. त्याचबरोबर अडीच वर्ष महापौर पदावर असलेल्या आणि घरी दहा वर्ष नगरसेवक पद असलेल्या माजी महापौर सई खराडे यांचे पुत्र शिवतेज खराडे हे प्रभाग क्रमांक आठ मधून निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
प्रभाग क्रमांक दोन मधून स्वरूप सुनील कदम हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. कोल्हापुरात तर नगरपालिकेपासून कदम घराण्यात नगरसेवक हे पद आज तागायत कायम आहे. आजोबा दिवंगत शिवाजीराव कदम, वडील सुनील कदम हे महापौर होते महापौर, स्थायी समिती सभापती होते. तर चुलते सत्यजित उर्फ नाना कदम हे दहा वर्ष नगरसेवक आहेत. शिवाय शिंदे सेनेचे ते जिल्हा समन्वयक आहेत. प्रभाग क्रमांक 16 मधून करण दीपक जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात असू शकतात. वडील दीपक जाधव हे महापौर, तर चुलते मुरलीधर जाधव हे स्थायी समिती सभापती आणि विरोधी पक्ष नेते होते. गेली वीस वर्ष त्यांच्या घरी पद आहे.
प्रभाग क्रमांक दहा मधून माजी नगरसेविका दीपा मगदूम यांचे चिरंजीव सुयोग मगदूम हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. जवळपास दीपा मगदूम यांची उमेदवारी निश्चित समजली जाते. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या निर्णयावर सुयोग मगदूम हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. त्यांचे वडील दिलीप मगदूम हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात गाजलेले व्यक्तिमत्व होते. तर काही काळासाठी ते महापौर देखील होते.
मधुकर रामाने यांचे चिरंजीव अमर रामाने हे देखील निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक 19 मधून उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या पत्नी अश्विनी रामाने यांनी महापौर पदाला गवसणी घातली होती. त्याचबरोबर उत्तम कोराने यांचे चिरंजीव निखिल निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. उत्तम कोराने आणि त्यांच्या पत्नी प्रत्येकी एक टर्म कापूर महानगरपालिकेत नगरसेवक होत्या.
यावतील बहुतांश वारसदारांचा ओढा हा महायुतीतील पक्षांकडे आहेत. तर काहीजण काँग्रेस मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. वरिष्ठांच्या निर्णयानुसारच महायुतीतील पक्ष ठरणार असून त्या महापालिकेच्या निवडणुकीत वारसदारांचा मुद्दा गाजणार हे नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.