
हिंदुस्थानी भाऊने महादेवी हत्तीणीवर वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कोल्हापूरकरांमध्ये संताप उसळला.
शिवसेना (उद्धव गट) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेत भाऊला 'कोल्हापुरी पायताण' दाखवले.
सोशल मीडिया व जनतेच्या रोषामुळे भाऊने नरम भूमिका घेत माफी मागितली व स्पष्ट केलं की, त्याचा कोल्हापूरकरांना दुखवण्याचा हेतू नव्हता.
Kolhapur News : राज्यातील जनता आणि दोन कारणावरून रोष व्यक्त करताना दिसत असून प्रामुख्याने जैन समाज रस्त्यावर उतरला आहे. कोल्हापुरात महादेवी हत्तीण आणि मुंबईमधील दादरच्या कबुतर खाण्याचा वाद चिघळला आहे. दोन्हीकडेही नागरीक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच महादेवी हत्तीणीवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊने व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यानंतर या वादात तेल ओतण्याचे काम केलं आहे. त्यानंतर कोल्हापुरकरांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. तसेच हिंदुस्थानी भाऊला थेट 'कोल्हापुरी पायताणच' दाखवले. ज्यानंतर हिंदुस्थानी भाऊ नरमला असून त्यानेही माफी मागितली आहे. त्याने दिलगिरी व्यक्त करताना माझा कोल्हापुरकरांना दुखवण्याचा हेतू नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जिनसेन मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीण एक आठवड्यांपूर्वी गुजरात येथील जामनगरच्या वनतारामध्ये नेण्यात आली. ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने करण्यात आली. मात्र या आदेशानंतर कोल्हापुरकर रस्त्यावर उतरले. त्यांनी वनतारासह अंबानींना धडा शिकवण्यासाठी कंबर कसली आणि जिओ बॉयकॉट आणि माधुरी ब्रिंग बॅकचा नारा दिला. यामुळे वनतारा प्रशासनाने गुडघे टेकले असून मराठीत कोल्हापुरच्या जनतेची माफी मागितली. तसेच महादेवीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी आपण स्वत: पुढाकार घेऊ कोल्हापुरकरांच्या लढ्यात साथ देवू अशी ग्वाही दिली. यामुळे वनताराबद्दलचा संताप काहीसा कमी झाला आहे.
मात्र माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबद्दल विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊने केलेल्या वक्तव्यावरून आता वाद सुरू झाला आहे. त्याने कोल्हापुरातील रहिवाशांना अर्वाच्च भाषेत केलेल्या शिवीगाळीनंतर तीव्र संताप व्यक्त होतोय. तसेच या हिंदुस्थानी भाऊला कोल्हापुरी पायताणाने चोपणार असा इशाराच शिवसेनेच्या (उबाठा) प्रशांत भिसे यांनी मुंबईतच दिला आहे. त्यांनी कोल्हापूरवासियांचा अपमान करणाऱ्या विकास पाठकला कोल्हापुरी पायताणाने कोल्हापुरी हिसका काय असतो दाखवू, असा इशारा दिला आहे.
तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच दाखल झालेल्या हर्षल सुर्वे यांनी देखील हिंदुस्थानी भाऊला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी, "कोल्हापूरबद्दल काही बोलायचं असेल, तर इथं येऊन जनतेसमोर बोलून दाखवं, असे आव्हान दिले आहे. तसेच "महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या आंदोलनामागे कुठलाही राजकीय अजेंडा नाही. हे जनतेच्या भावना आणि संस्कृतीशी जोडलेलं आंदोलन आहे. पण फक्त स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतून हिंदुस्तानी भाऊने कोल्हापूरविरोधात अवमानकारक शब्द वापरले. जे आम्ही सहन करणार नाही. कोल्हापूरी माणूस केवळ पायात पायतान घालत नाही. तर हातातही 'सुताखणे' ठेवतो. त्यामुळे जेव्हा कोल्हापुरात याल तेव्हा तुमचं स्वागत आता पायतान घेऊनच होईल, असाही इशारा सुर्वे यांनी दिला आहे.
जनतेसह राजकीय पक्षांच्या वाढलेल्या संतापानंतर हिंदुस्तानी भाऊ कोल्हापुरकरांची माफी मागितली आहे. त्याने एका व्हिडिओद्वारे दिलगिरी व्यक्त करत सांगितलं की, "मी हिंदू आणि हिंदुत्वावर बोलतो तेव्हा काही लोकांना अस्वस्थता होती. यामुळेच कदाचित माझं इंस्टाग्राम अकाउंट रिपोर्ट करून बंद केलं गेलं होतं. आज ते परत मिळालं, आणि मी बघितलं की अनेक लोकांचे डीएम्स आले आहेत." त्यांनी कुणाचंही नाव न घेता, महादेवी प्रकरणाचा वापर करून काहीजण वैयक्तिक द्वेष पसरवत आहेत. खूप लोकांना वाटतंय की, हिंदूस्तानी भाऊने कोल्हापूरकरांवर बोललो, पण तसं नाही. मी माझ्या आई आणि महालक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो की, मी राजकारणी लोकांविषयी बोलत होतो. या आंदोलनातील राजकारणी लोकांचा खरा चेहरा समोर येईल'.
प्रश्न 1: हिंदुस्थानी भाऊने नेमकं काय केलं?
उत्तर: भाऊने महादेवी हत्तीणीबाबत एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला, ज्यामुळे कोल्हापुरात संताप उसळला.
प्रश्न 2: कोल्हापुरातील जनतेची प्रतिक्रिया काय होती?
उत्तर: कोल्हापुरकरांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला आणि भाऊला 'कोल्हापुरी पायताण' दाखवल्याचं सांगितलं.
प्रश्न 3: भाऊने माफी मागितली का?
उत्तर: होय, वाढत्या दबावामुळे भाऊने माफी मागून स्पष्ट केलं की, त्याचा उद्देश कोल्हापूरकरांचा अपमान करणे नव्हता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.