

Solapur, 01 September : माजी आमदार बबनदादा शिंदेंनी हृदयरोपणसारखी मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतरही पहिलं भाषण स्वतःवर न करता मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात केलं. माढा मतदारसंघातील अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. पण राहिलेले प्रश्न सोडविण्याची जबाबदारी तुमची आणि पालकमंत्री म्हणून माझीही आहे. त्यामुळे दादा काळजी करू नका. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मी पालकमंत्री आहे, तोपर्यंत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माढा मतदारसंघाचा, आपल्या सर्वांचा वकील म्हणून सरकारमध्ये काम करण्याचा शब्द हा जयकुमार गोरे आपल्याला देतो, अशा शब्दांत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विकासकामांत मदतीची ग्वाही दिली.
माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यावर अमेरिकेत यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज प्रथमच माढ्यात आले. तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या कार्यस्थळी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात पालकमंत्री गोरे बोलत होते.
ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं की, बबनदादांना भेटायची माझी खूप इच्छा आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा द्या आणि शब्द देऊन या की लवकरच मुख्यमंत्री फडणवीस तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी माढ्यात येतील.
माढा मतदारसंघातील सर्व प्रश्न सुटेपर्यंत आता जाणे नाही. बबनदादांनी आता भाजपसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. पण ते कोणाबद्दलही वाईट बोलले नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार, (स्व) अजितदादा, (स्व.) मनोहर जोशी या सर्वांची आठवण त्यांनी काढली. ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांच्या ऋणात राहणारा, त्याची जाणीव ठेवणारा दादांसारखा कदाचित एखाद्याच नेता असतो, अशा शब्दांत गोरे यांनी त्यांचे कौतुकही केले.
ते म्हणाले, आज सकाळपासून तुम्ही थांबला आहात. तुम्हा सर्वांना बबनदादांना भेटायचं होतं. पण घोंगड्यासाठी आमचंही कीर्तन तुम्हाला ऐकावं लागणार आहे. दादा, तुम्ही कामाला जेवढं चिकट आहात ना. त्यापेक्षा तुमचं दोन्ही गडी (मुलं) फास्ट आहेत. रणजित शिंदे कामाचं पत्र घेऊन आला तर मी काय लिहितोय, हेही वाकून बघतो. नाही नाही भाऊ, कार्यवाही करा, असं लिहिलं पाहिजे, हेही तो मला सांगत असतो.
दुसरा गडी तर मी काय लिहियचं हेही सांगत असतो. फोन करतो असे सांगितलं तर बाहेर जाऊन संबंधितांना फोन लावून पालकमंत्री बोलणार आहेत, असे सांगून माझ्याकडे फोन घेऊन येतो. मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याची चिकाटी संपूर्ण शिंदे कुटुंबात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कुंकवाच्या बळावरून सोपल-गोरेंमध्ये जुगलबंदी
एकाच कुंकवाचं एवढं मजबूत होतं की, बबनदादांना जवान करून आपल्या सर्वांसोबत घेऊन आलं, मग मला सांगा ज्यांच्यासोबत दहा कुंकवाचं बळ आहे, तो कसा असेल. (व्यासपीठाकडे पाहत) तुम्हाला नाही म्हटलं. बघा निशाणा सही जागा पे लगा है. पण गमतीचा भाग सोडला तरी बबनदादांच्या सुखा-दुःखात सातत्याने दिलीप सोपल राहिले आहेत, असा टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलीप सोपल यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.