
राजेंद्र त्रिमुखे :
Ahmednagar NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटी नंतर बुधवारी (5 जुलै) मुंबईमध्ये शरद पवार यांच्या तसेच अजित पवार यांच्या गटाच्या स्वतंत्र बैठका झाल्या. या दोन्हीही बैठकांना अहमदनगर जिल्ह्यातून कोण कुठे उपस्थित राहतो याबद्दल मोठी उत्सुकता होती. यात जिल्ह्यातील आमदार कुणाकुणाच्या बाजूला जाणार तसेच जिल्हा राष्ट्रवादी तसेच तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी काय भूमिका घेतात याकडेही अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून होते. (Latest Marathi News)
यासंदर्भात काल दिवसभर एकूणच दिसून आलेली परिस्थिती पाहता तसेच विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या कडून मिळलेल्या प्रतिक्रिया पाहता एकूणच नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बहुतांशी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे शरद पवार यांच्या बाजूने उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा आमदारांपैकी तीन आमदारांची भूमिका स्पष्ट झाली असून आमदार रोहित पवार, आमदार किरण लहामटे, आमदार प्राजक्त तनपुरे हे तीन आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. तर आमदार निलेश लंके आणि आमदार संग्राम जगताप यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले आहे. निलेश लंके यांची भूमिका शेवट पर्यंत द्विधा दिसून येत होती. मात्र शेवटी त्यांनी अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थिती लावून आपली भूमिका स्पष्ट केली.
कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे सध्या विदेशात आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आशुतोष काळे हे शरद पवार यांच्या सोबतच असणार असल्याचे म्हंटले आहे. शिर्डी संस्थान वर अशुतोष काळे यांना अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच अध्यक्ष होता आले होते. त्यांना उमेदवारीही शरद पवारांनीच दिली होती. त्यामुळे त्यांचा कल शरद पवार यांच्या बाजूनेच असल्याचे समोर येत आहे. एकंदरीत जिल्ह्यातील सहा आमदारांपैकी चार आमदार हे शरद पवार यांच्या बाजूने तर दोन आमदार हे अजित पवार यांच्या गटात असल्याचं स्पष्ट होत आहे.
पदाधिकाऱ्यांचा विचार करता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह बहुतांश पदाधिकारी हे शरद पवार यांच्या बैठकीला हजर असल्याने पक्ष पातळीवर राष्ट्रवादी शरद पवारांच्या पाठीशी मोठ्या संख्येने असल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील चौदा तालुक्यांपैकी कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, अकोले या तालुक्यातील पदाधिकारी शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली आहे. जिल्ह्यातील घुले बंधू, राहुल जगताप, दादा कळमकर, प्रताप ढाकणे, शिवशंकर राजळे असे अनेक महत्वाचे मोठी नावे शरद पवार यांच्या सोबतच आहेत.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अहमदनगर मध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप मात्र अजित पवार यांच्यासोबत सुरुवातीपासूनच आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नगर शहरात 18 नगरसेवक असून बहुतांशी नगरसेवक हे संग्राम जगताप यांच्या सोबतच असल्याने तेही अजित पवार यांच्यासोबत असल्याचे चित्र आहे. शहरातील नागरी विकास कामांना भविष्यात लागणाऱ्या निधीच्या भूमिकेतून सर्व नगरसेवकांनी आमदार संग्राम जगताप यांची भूमिका हीच आमची भूमिका असेल असे सांगितले आहे. मात्र काही नगरसेवक आणि पदाधिकारी अजूनही द्विधा मनस्थितीत असून आम्हाला शरद पवार आणि अजित पवार हे एकच असून राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत योग्य वेळी भूमिका स्पष्ट करू असं काही जणांनी सांगितला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.