Satara Politic's : गोरे, भोसलेंची यशस्वी शिष्टाई; ‘सह्याद्री’त विरोधात लढलेले आमदार घोरपडे अन्‌ कदम, वेताळ यांच्यात अखेर मनोमिलन

Karad North Political News : सह्याद्री साखर कारखान्यासाठी बाळासाहेब पाटील, मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, कॉंग्रेसचे निवास थोरात यांचे एक असे तीन पॅनेल पडले.
Satara Political Leader
Satara Political LeaderSarkarnama
Published on
Updated on

Karad, 05 August : विधानसभा निवडणुकीत एकत्र येऊन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला अस्मान दाखविणाऱ्या भाजपमध्ये सह्याद्री साखर कारखान्याच निवडणुकीत फाटाफूट झाली होती. आमदार मनोज घोरपडे यांच्या विरुद्ध भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांनी दंड थोपटले होते. मात्र पक्षातील फूट ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अंगलट येऊ शकते, हे लक्षात घेऊन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी मध्यस्थी करत आमदार घोरपडे आणि कदम, वेताळ यांच्यात मनोमिलन घडवून आणले आहे. विशेष म्हणजे हे सर्व नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.

कऱ्हाड उत्तर (Karad North) हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचे कार्यक्षेत्र हे सातारा, खटाव, कोरेगा आणि कराड अशा चार तालुक्यांमध्ये विभागले आहे. या मतदारसंघावर स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व राखले आहे. ‘कराड उत्तर’मधून आतापर्यंत यशवंतराव चव्हाण, त्यानंतर ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील, त्यांच्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून माजी आमदार पाटील यांचा मतदारसंघातील प्रत्येक गावांत संपर्क आहे. त्यामुळे त्यांची मतदार संघातील पाळेमुळे घट्ट आहेत.

विधानसभेच्या २०१९ निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून धैर्यशील कदम यांनी, तर अपक्ष म्हणून मनोज घोरपडे (Manoj Ghorpade) यांनी निवडणुक लढवली होती. त्या निवडणुकीत मनोज घोरपडे यांना ५१ हजार २९४, तर धैर्यशील कदम यांना ३९ हजार ७९१ मते पडली होती. कदम आणि घोरपडे यांच्यात झालेल्या मतांच्या विभागणीचा फायदा पाटील यांना झाला होता. ते तब्बल एक लाख ५०९ मते मिळवून विजयी झाले होते. पण त्या निवडणुकीने भाजप नेत्यांना एकत्रित आल्यास विजयाची खात्री दिली होती.

भाजपचे तत्कालीन सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या माध्यमातून मनोज घोरपडे, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांनी भाजपच्या मंत्र्यांकडून निधी आणून मतदारसंघात ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला. भाजपचे संपूर्ण नेते एकत्र येऊन काम करत होते. त्याचा फायदा पक्षसंघटना मजबूत होण्यास झाला. त्यानंतर भाजपचे सातारा जिल्हाध्यक्षपद कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघातील धैर्यशील कदम यांच्याकडे देण्यात आले होते.

एकास एक उमेदवार दिल्यास विजय मिळू शकतो, हे लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीत मनोज घोरपडे यांना उमेदवारी देण्यात आली. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर कऱ्हाडमधील नेत्यांच्या पाठीशी ताकद उभी केली. एकास एक लढत झाल्याने बाळासाहेब पाटील यांना मतविभागणीचा फायदा होऊ शकला नाही, त्यामुळे भाजपचे आमदार म्हणून मनोज घोरपडे यांनी प्रथमच उत्तर कराडमधून बाजी मारली.

Satara Political Leader
Umesh Patil : आमदारकीची हौस लय भारी; राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाच्या गाडीवर आमदारकीचा लोगो असलेले स्टिकर!

विधानसभेच्या निकालानंतर लगेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. आमदारकी जिंकलेल्या मनोज घोरपडे यांनी सह्याद्री कारखानाही ताब्यात घ्यायचा असा निर्धार केला. त्यादृष्टीने त्यांनी राजकीय समीकरणे जुळवायला सुरुवात केली. दुसरीकडे, विधानसभा हरलेल्या बाळासाहेबांनी कारखाना आपल्याच ताब्यात राहावा, यासाठी दुसऱ्या दिवसांपासून पायाला भिंगरी बांधून कार्यक्षेत्रात दौरे सुरू केले. बाळासाहेब पाटलांनी तब्बल १९१ गावांत जाऊन सभासद, मतदारांशी संपर्क साधून सह्याद्री पॅटर्न पटवून दिला.

दरम्यान, कारखान्याच्या निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आमदार घोरपडे, भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारणी सदस्य रामकृष्ण वेताळ, कॉंग्रेसचे निवास थोरात यांच्यात एकमत झाले नाही. त्यामुळे विरोधकांमध्ये फाटाफूट झाली. त्यामुळे सह्याद्री साखर कारखान्यासाठी बाळासाहेब पाटील, मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, कॉंग्रेसचे निवास थोरात यांचे एक असे तीन पॅनेल पडले.

विरोधकांमध्ये झालेली फाटाफूट सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पथ्यावर पडली आणि बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने पुन्हा एकादा बाजी मारली. सह्याद्री कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये फूट पडली. एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आली. त्यातून भाजप नेत्यांची मने दुखावली गेली, त्यामुळे भाजपमध्ये कलह वाढला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपमधील हा वाद पक्षाला परवडणारा नाही, हे लक्षात घेऊन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष डॉ. भोसले यांनी शिष्टाई करुन संबंधित नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणले. संबंधित नेते सर्वकाही विसरून एकत्र आले, त्यामुळे मंत्री गोरे आणि जिल्हाध्यक्ष भोसले यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे.

Satara Political Leader
konkan Politic's : भरत गोगावलेंच्या पालकमंत्रिपदासाठी आता उदय सामंत करणार मुख्यमंत्र्यांकडे शिष्टाई; स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदनासाठी प्रयत्नशील

अखेर उत्तर कराडमधील भाजपची त्रिमूर्ती एकाच व्यासपीठार आली

सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत एकमेकांवर सडकून टीका करण्यात आली होती. त्यामुळे भाजपचे हे नेते पुन्हा एकत्र येतील का नाही, परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पुसेसावळी येथे नुकतेच झालेल्या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारणी सदस्य रामकृष्ण वेताळ हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com