

Solapur, 16 August (प्रभूलिंग वारशेट्टी) : सोलापुरात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातील राजकीय वाद विकोपाला पोचला आहे. खासदार संजय राऊत यांच्या टीकेनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते.
पालकमंत्री गोरे यांनी अंधारे यांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांचा उल्लेख 'ज्येष्ठ भगिनी' असा केला होता आणि त्यांना चुकीचे ब्रीफिंग करणाऱ्यांवर निशाणा साधला होता. मात्र, या पत्रकार परिषदेनंतर दुसऱ्याच दिवशी सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत पालकमंत्र्यांवर जोरदार पलटवार केला आहे.
सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट....
जयकुमार गोरे हे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत आणि संस्कार असतील की नाही याबद्दल तर शंकाच आहे...
जयकुमार, पत्रकार परिषद घेत असताना थोडी कमी पीत चला...आणि हो एखाद्याच्या पत्रकार परिषदेचे उत्तर द्यायचं असेल तर आधी त्याने घेतलेली पत्रकार परिषद पूर्ण बघत चला... तुमच्यासाठी XXXXX हा शब्द संपूर्ण पत्रकार परिषदेत कुठेही वापरलेला नाही. पण, तुम्हाला स्वतःला जर त्याबद्दल इतकी खात्री वाटत असेल तर त्याला माझा नाइलाज आहे...!
तुमच्या आजूबाजूला बसलेले तुमचे जे दोन चमचे वजा दलाल आहेत ना, कदाचित त्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग केलेलं आहे.
आता तुमच्या दुसऱ्या वाक्याकडे येऊ, तुमच्या बोलण्याचं मला फार विशेष असं वाटलं नाही. भाजपचा मंत्री म्हटल्यावर ही भाषा फारच सहज स्वाभाविक आहे. कारण, तुमच्यासारख्या माणसाकडून दुसरी काहीच अपेक्षा असू शकत नाही.
फक्त एकच छोटासा प्रश्न, काल तुम्ही माझा उल्लेख ‘ज्येष्ठ भगिनी’ असा केलात आणि आज तुमच्या तोंडी असे शब्द आहेत. जयकुमार, तुमच्याकडे मोठ्या किंवा छोट्या बहिणीशी याच भाषेत बोलतात का... ?’
सुषमा अंधारे यांची ही अत्यंत तिखट पोस्ट सोलापूरसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. आता या टीकेला पालकमंत्री जयकुमार गोरे किंवा भाजपचे स्थानिक नेते काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.