Karad News, 10 Apr : कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पाडली. या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विरोधकांचा सुपडासाफ करत एकहाती सत्ता मिळवली.
पाटील यांच्या पी.डी. पाटील पॅनेलचे सर्व 21 उमेदवार विजयी झाले. या विजयाची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात जोरात सुरू आहे. विधानसभेला बाळासाहेब पाटील यांचा पराभव करणाऱ्या भाजप आमदार मनोज घोरपडे यांचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपला डीवचलं आहे.
ही निवडणूक 'ईव्हीएम'वर झाली नाही त्यामुळे बाळासाहेब पाटील विजयी झाले असं म्हणत घोरपडे यांच्या विजयावर शंका उपस्थित केली. दरम्यान, राज्यभरात सह्याद्रीच्या निकालाची चर्चा आणि बाळासाहेब पाटील यांच्या विजयाचा जल्लोष सुरू असताना मनोज घोरपडे यांनी पाटील यांना डिवचलं आहे.
"सह्याद्री साखर कारखाना जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकला असं होत नाही"; असं घोरपडेंनी म्हटलं आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निकालावर प्रतिक्रिया देताना घोरपडे म्हणाले, निवडणुकीत सभासदांनी दिलेला कौल मान्य केला आहे. मात्र, सत्ताधारी साखर कारखाना जिंकला म्हणून संपूर्ण महाराष्ट्र जिंकल्याच्या अविर्भावात वावरत आहेत.
सहकारातील निवडणुका या इतर निवडणुकांपेक्षा वेगळ्या असतात. त्यांनी जवळपास 9 हजार मयत सभासदांच्या नोंदी रखडवल्यामुळे त्यांचा विजय सुकर झाल्याचा आरोप घोरपडे यांनी केला. शिवाय कारखान्यात विजय झाला म्हणून 'ईव्हीएम'मुळे विधानसभेला निवडून आलो म्हणणं चुकीचं आहे. शिवाय आजही नऊ हजार सभासद वारस नोंदीपासून वंचित आहेत.
कारखान्यामध्ये वारस नोंदी केल्यानंतर निवडणूक घ्या मग सगळ्यांना रिझल्ट कळेल. त्यानंतर मी आमदारकीचा राजीनामा देऊन विधानसभा लढवायला तयार आहे, असं म्हणत त्यांनी बाळासाहेब पाटलांना आव्हान दिलं. तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर अनेक दशकांपासून एकाच कुटुंबाची सत्ता आहे.
सत्तेचे विकेंद्रीकरण करून कारखाना सभासदांच्या ताब्यात देण्याच्या उद्देशाने आपण निवडणुकीला सामोरे गेलो. पॅनेल टाकून ही कारखान्याची निवडणूक लढवावी हा सभासदांचा आग्रह होता. शिवाय ही निवडणूक जिंकून मला चेअरमन व्हायचं नव्हतं. मात्र, सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी सह्याद्री कारखान्याची निवडणूक लढवल्याचं घोरपडे यांनी स्पष्ट केलं.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.