

Wai taluka incident : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातून एका हळद पॉलिश करणाऱ्या व्यावसायिकाला शेतातून उचलून नेऊन, घरात डांबून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मनोज हरिश्चंद्र नायकवडी (वय 40, रा. बावधन) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाई पोलिसांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक दिलीप ननावरे, प्रसाद दत्तू ननावरे आणि अक्षय राजेंद्र ननावरे यांच्यासह एका अनोळखी दुचाकी चालकावर भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कडक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी मनोज नायकवडी हे खडकमाळ शिवारातील एका शेतात हळद पॉलिशचे काम करत असताना, आरोपी दीपक ननावरे याने त्यांना फोनवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळातच दीपक तिथे आपल्या चारचाकी गाडीसह पोहोचले आणि त्यांनी फिर्यादींना हाताने तसेच ठिबक सिंचनाच्या पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करत असतानाच फिर्यादींना जबरदस्तीने ओढत नेऊन गाडीत बसवले. मात्र, गाडी चालू न झाल्याने त्याने एका अनोळखी दुचाकीस्वाराला बोलावून फिर्यादींचे अपहरण केले आणि त्यांना स्वतःच्या घरी नेले.
दीपक ननावरे यांच्या घरी नेल्यानंतर, तिथे हजर असलेल्या प्रसाद दत्तू ननावरे आणि अक्षय राजेंद्र ननावरे यांनी फिर्यादींना लाथाबुक्क्यांनी जीवघेणी मारहाण केली. "तू आमच्या शिवारात आला तर ट्रॅक्टर जाळून टाकू" अशी धमकी देत आरोपींनी फिर्यादींच्या चुलत्यांनाही फोन करून बोलावून घेतले. फिर्यादींचे चुलते शामराव आणि चुलत भाऊ निखिल हे तिथे पोहोचले असता, आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की व मारहाण केली. "तुझे घर जाळून टाकेन आणि 22 तारीख झाल्यानंतर तुला संपवून टाकेन" अशी जिवे मारण्याची धमकी आरोपींनी सर्वांसमोर दिली.
तसेच फिर्यादी दीपक ननावरे यांच्या विरोधी पक्षाचा असल्यामुळे हा सगळा प्रकार राजकीय द्वेषापोटी झाला आहे. अनेक दिवस दीपक ननावरे हे माझ्यावर डोळा ठेऊन होते. तसेच त्यांनी यावेळी मंत्री मकरंद पाटील यांच्या नावाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप मनोज नायकवडी यांनी केला आहे.
या गंभीर प्रकारानंतर जखमी मनोज नायकवडी यांनी वाई ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपींविरुद्ध BNS कलम ११८(१), १४०(३), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३५१(४) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
याबाबत दीपक ननावरे म्हणाले, माझ्या कुटुंबातील होणाऱ्या शुभकार्याचे निमंत्रण देण्याकरिता माझ्या कुटुंबातील व्यक्ती नायकवडी यांच्या घरी गेले होते. परंतु त्या ठिकाणी मनोज नाईकवाडी यांनी निमंत्रण स्वीकारण्याऐवजी त्यांना शिवीगाळ केली, त्यामुळे हा वाद निर्माण झाला. खरंतर आमचा व्यक्तिगत कौटुंबिक वाद होता, परंतु विरोधी पक्षान याला राजकीय वळण देऊन माझ्या शुभ कार्यात अडथळा आणण्याचे काम केले आहे. मी आणि माझे कुटुंब या सगळ्याचा जाहीर निषेध करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.