

Satara, 19 February : सातारा जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर होऊन आज अकरा दिवस झाले तरी सत्ता कोण स्थापन करणार, हे अद्याप निश्चित झाले नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे सत्ता स्थापन करण्याएवढे संख्याबळ असून त्यांनी आपले सदस्य अज्ञातस्थळी पाठविले आहेत. दुसरीकडे, भाजपनेही जिल्हा परिषद अध्यक्ष आमचाच होणार, असे जाहीर केले असून त्यांच्याकडून वरिष्ठ पातळीवर सूत्रं हलवली जात आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्यात आली असून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) ६५ जागांपैकी २७ जागा जिंकून भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, सत्ता स्थापनेइतके संख्याबळ भाजपकडे नाही. त्यानंतरही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार, अशी घोषणा करून डावपेच टाकायला सुरुवात केली आहे. तसेच, शिवेंद्रसिंहराजे भासेले यांनीही ‘देवेंद्र है तो सब मुमकीन है’ असे विधान केल्याने महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी सावध झाले आहेत.
भाजपच्या (BJP) ऑपरेशन लोट्सच्या भीतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपले सदस्य सुरक्षित स्थळी सहलीवर पाठवून दिले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील बॉडिंग हे भाजपसाठी डोकेदुःखी ठरत आहे. शिवाय अपक्ष आणि इतर सदस्यही हाती लागण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे भाजपने आता नवे डावपेच आखायला सुरुवात केली आहे.
भाजपकडून झालेल्या टीकेमुळे तसेच पाटणमध्ये घेरण्याचा प्रयत्न झाल्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई हे कमालीचे दुखावले आहेत. त्यांनी सर्व परिस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालण्याचे ठरविले आहे, त्यामुळे स्थानिक नेत्यांची भाजपशी जुळवून न घेण्याची मानसिकता लक्षात घेता भाजकडून आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
भाजपकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. भोसले आणि शिवसेनेच्या वरिष्ठ स्तरावरील नेत्यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पुढे आलेले आहे. या घडामोडींमुळे आगामी काही दिवसांत झेडपीच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पण झेडपीची सत्ता कोणाच्या हाती जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप आणि शिवसेनेत सातारा जिल्ह्यात स्थानिक पातळीवर चर्चा अशक्य आहे, त्यामुळे भाजपने आता राज्य पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून सत्तासमीकरण जुळविण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका महत्वाची आहे. त्यांची आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क घडवून समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.