Kolhapur News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर चार नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीचा दिवस पार पडणार आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडी आणि महायुती मधील बंडखोरांनी विद्यमान आमदारांना आणि उमेदवारांना घाम फुटला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ वगळता सर्वच विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशावेळी उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच सर्वच पक्षी उमेदवारांच्या मुळावर उठला आहे. त्यामुळे बंडखोर विद्यमान आणि पक्षीय उमेदवारांसाठी धोकादायक ठरू शकतात. अशा बंडोबांचे बंड थंड करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या सर्वच मतदारसंघांतून बहुतांश बंडखोरांचेही अर्ज दाखल झालेत. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या बंडोबांना थंड करण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे. दिवाळीचे निमित्त साधून फराळाच्या निमित्ताने बंडोबांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्लॅन आखला जात आहे.
भविष्यातील राजकारणाचा शब्द किंवा राजकीय पुनर्वसन यासारखे पर्याय देण्याची शक्यता आहे. मात्र अनेकजन नेत्यांनाच आपली राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्नात आहेत. त्यामुळे त्याचा फटका आजी- माजी आमदारांना बसण्याची शक्यता आहे.
अडीच वर्षांत बदललेली राजकीय समिकरणामुळे उमेदवारी मिळवण्यात निर्माण झालेली अडचण हीच बंडखोरी होण्यामागची प्रमुख कारणे आहेत. यात महाविकास आघाडीबरोबरच महायुतीतही मोठ्या प्रमाणात बंडखोरीची शक्यता आहे.
महाविकास आघाडीमध्ये अडचण निर्माण झालेल्या तीन मतदारसंघांमध्ये माजी आमदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा खांद्यावर घेत बंडखोर केली आहे. यामध्ये हातकलंगलेतून माजी आमदार सुजित मिनचेकर आणि शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांचा समावेश आहे. शिवाय या दोघांना पक्षात घेतल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी देखील बंडखोरी केली आहे.
महायुतीत चंदगडची विधानसभा मतदारसंघातील जागा ही राष्ट्रवादीला असल्याने त्या ठिकाणी राजेश पाटील (Rajesh Patil) मैदानात उतरले. पण त्यांच्याच विरोधात भाजपचे नेते शिवाजीराव पाटील हे मैदानात उतरले असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा ठाम निर्धार त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीतून या मतदारसंघात अप्पी पाटील, गोपाळराव पाटील हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
महायुतीमध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाला अधिकृतरित्या पन्हाळा शाहूवाडी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघ मिळाला आहे. मात्र उर्वरित दोन जागांवर त्यांनी उमेदवार उभा करत आपले बंड दाखवून दिले आहे. करवीर आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात उमेदवार देऊन त्यांनी महायुतीत बंडखोरी केली आहे. करवीरमधून संताजी घोरपडे आणि चंदगड मधून मानसिंग खोराटे यांना उमेदवारी देत बंडाचे निशान फडकवले आहे.
राधानगरीतून महाविकासची उमेदवारी मिळेल या आशेवर असलेले जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांना पुन्हा डावलण्यात आले. परिणामी, त्यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अर्ज कायम ठेवला तर ते पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरणार आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात देखील हीच परिस्थिती आहे.
काँग्रेसचा (Congress)उमेदवार म्हणून पहिली पसंती राजेश लाटकर यांना दिली होती. मात्र काँग्रेस मधील वाढता उद्रेक पाहून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यांच्या ठिकाणी मधुरिमा राजे छत्रपती यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. मात्र लाटकर यांनी अपक्ष निवडणुकीचा अर्ज भरला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात बंडोबांची अडचण लक्षात घेऊन आजी माजी आमदारांनी फासे टाकायला सुरुवात केली आहे. अर्ज माघारीची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर असल्याने दिवाळीच्या निमित्ताने बंडोबांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू करणार आहेत.
कोल्हापूर उत्तर, करवीर, चंदगड, हातकणंगले, आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारांना या बंडखोरांचा फटका बसणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळे या बंडोबांचे बंड थंड करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.