Kolhapur News : कधीकाळी जिल्ह्यात अधिराज्य गाजवणाऱ्या काँग्रेसचे 7 नगरपालिकांमधून 'हात' चिन्ह गायब झाले आहे. नगरपालिका निवडणुकीत स्थानिक आघाड्यांमध्ये अडकल्याने काँग्रेसला निवडणुकीआधीच 7 नगरपालिकेमधून माघार घ्यावी लागली आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या अस्तित्वासाठी लढावे लागत आहे. अशातच काही नगरपालिकेमध्ये स्वबळावर लढावे लागत असताना, इतर नगरपालिकेमध्ये घटक पक्ष आणि महायुतीतील पक्षांचा आधार घ्यावा लागला आहे.
दरम्यान, कुरुंदवाड, आजरा, हातकणंगले व हुपरी नगरपालिकेत मात्र काँग्रेसचे 12 उमेदवार चिन्हावर आहेत. कुरुंदवाड, हुपरी, हातकणंगलेत नगराध्यक्षांसह १९ नगरसेवक 'हात' चिन्हावर आहेत. आजऱ्यात नगराध्यक्ष पदासह १२ उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर रिंगणात आहेत. मुरगूड, पेठवडगाव, शिरोळ, गडहिंग्लज, पन्हाळा, चंदगड, जयसिंगपूर नगरपालिकेत काँग्रेसने अन्य पक्षांशी आघाडी केल्याने तिथेही पक्षाचे चिन्ह दिसणार नाही.
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवर झालेल्या आघाड्यांमुळे सात नगरपालिकेत काँग्रेसचे 'हात' चिन्ह दिसणार नाही. कागलमध्ये नगराध्यक्षांसह नगरसेवक पदाच्या एका जागेसाठी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारांचे अर्ज आहेत; पण त्यांचेही अजून 'तळ्यात मळ्यात' आहे. मुरगूड, मलकापूर, पेठवडगाव, जयसिंगपूर नगरपालिकांमध्ये भाजप सोबत आघाडी केली आहे. शिरोळ नगरपालिकेमध्ये शिवशाहू-स्वाभिमानी शेतकरी संघटने सोबत आघाडी केली आहे. गडहिंग्लज, पन्हाळा, चंदगड नगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि जनसुराज्य शक्ती सोबत आघाडी केली आहे.
जयसिंगपूरमध्ये काँग्रेसने भाजप-स्वाभिमानीशी आघाडी केल्याने तिथे पक्षाचे चिन्ह नाही. गडहिंग्लजमध्ये काँग्रेसला मानणाऱ्या कुराडे गटाने जनसुराज्य-जनता दल-भाजपशी आघाडी केली आहे. तिथे काँग्रेसचे उमेदवार 'जनसुराज्य'च्या चिन्हावर आहेत.
पेठवडगाव नगरपालिकेच्या इतिहासात पक्षीय पातळीवर कधी निवडणूक झालेली नाही. त्यामुळे तिथे काँग्रेसला मानणाऱ्या यादव गटाने स्वतंत्र आघाडी केली आहे. पन्हाळ्यातही काँग्रेस समर्थक भोसले गट 'जनसुराज्य 'सोबत आघाडीत आहे.
आजरा नगरपंचायतीत काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पक्षाची आघाडी आहे, तिथे नगराध्यक्षांसह १२ जण पक्षाच्या चिन्हावर रिंगणात आहेत. शिरोळ नगरपालिकेतही काँग्रेसने शिवशाहू आघाडी व पक्षाशी आघाडी केली आहे. परिणामी या नगरपालिकेत काँग्रेसच्या उमेदवारांना आघाडीच्या चिन्हावर लढावे लागणार आहे.
हुपरीत काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नाही, तथापि नगरसेवक पदाचे आठ उमेदवार पक्षाच्या चिन्हावर रिंगणात आहेत. चंदगडमध्ये काँग्रेसने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत समावेश होण्याचा निर्णय घेतला; पण पक्षाच्या चिन्हावर इथेही उमेदवार नाही. मलकापूर, मुरगूडमध्ये काँग्रेसचा एकही उमेदवार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.