

Kolhapur Flood Control: दरवर्षी पावसाळ्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण होणाऱ्या महापुराच्या भीषण परिस्थितीमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फटका सहन करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.
या समस्येची दखल घेत मागील वर्षी जागतिक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दोन्ही जिल्ह्यांमधील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली होती. या पाहणीनंतरच्या प्रक्रियेला गती देत, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'एक्स' हॅण्डलवरून या प्रकल्पाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँकेने संयुक्तपणे राबवलेल्या 'महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम' (MRDP) अंतर्गत आवश्यक ती सर्व पूर्वतयारी आणि प्रशासकीय प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. ३,२०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाद्वारे कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी या शहरांसाठी एक प्रभावी दीर्घकालीन पूरनियंत्रण व्यवस्था उभी राहणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेत सुधारणा केली जाईल. तसेच, पावसाच्या पाण्याची साठवण क्षमता वाढवणे आणि शहरांमधील पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा अधिक आधुनिक व सक्षम करणे यांसारख्या सर्वंकष उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि त्याला केंद्र सरकारकडून मोलाचे सहकार्य मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत. तसेच, भारत सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाचे आणि जागतिक बँकेचे आभार मानत या प्रकल्पाची अंमलबजावणी आता आणखी जलद गतीने पुढे नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.