Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला पुन्हा एकदा 'उकळी' फुटली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळ दूध संघाची विविध प्रकरणे आणि तक्रारींचा अभ्यास असणाऱ्या दुग्ध विभागातील सहायक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांना पदावरून बुधवारी रात्री तडकाफडकी हलवण्यात आले.
रात्री उशिरा सावंतवाडीचे सहाय्यक निबंधक सुजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेले महिना-दीड महिन्यापासून गोकुळच्या संस्था अवसायन प्रकरण चांगले गाजत असतानाच आणि पुढील महिन्याभरात गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपत असतानाच ही बदली झाल्याने खळबळ उडाली आहे.
बुधवारी रात्री उशिरा मालगावे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. त्यांच्या ठिकाणी सावंतवाडीचे सहायक निबंधक सुजय कदम यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पण, मालगावे यांच्या बदलीचे ठिकाण निश्चित केलेले नाही. त्याबाबतचा आदेश स्वतंत्र काढण्यात येणार आहे. पण आज गोकुळ संदर्भात महत्त्वाची सुनावणी असल्याने मालगावे सुनावणीसाठी हजर राहणार आहेत.
गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1200 सभासदांचा विषय ऐरणीवर आहे. यंदा गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी 5470 सभासदांची यादी दुग्ध विभागाकडे पाठवण्यात आली होती. मात्र या यादीतील 1200 सभासद बेकायदेशीर असल्याची तक्रार दुग्ध निबंधक विभागीय पुणे कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. पाठवलेल्या यादीवर एका दूध संस्था संचालकांनी हरकत घेतल्याने ठराव मागवण्याची प्रक्रिया स्थगित झाली होती.
दरम्यान, निवडणूक लागल्यास बाराशे संस्था सभासदांची पात्रता किंवा अपात्रता निश्चित झालेली नाही. मात्र याबाबत निर्णय होऊनच गोकुळ दूध संघाच्या निवडणूक लागाव्यात अशी भूमिका गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी घेतली आहे. त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालय यांचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही, त्यामुळे निवडणूका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.