

Gokul News : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपले राजकीय ताकद पणाला लावून गोकुळ दूध संघातील बाराशे सभासदांच्या पात्रतेबाबत सभासदांच्या बाजूची भूमिका घेतली. मात्र प्रकाश बेलवडे यांच्या मागील अदृश्य शक्तीच्या आणि न्यायालयीन लढाईच्या पुढे मंत्री मुश्रीफांचे हे प्रयत्न असफल ठरले. 1308 संस्थांची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच गोकुळ संघाची निवडणूक होईल, असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंच ने दिल्यानंतर गोकुळ दूध संघावर प्रशासक येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एकीकडे भाजप वगळता महायुतीतील सर्वच नेत्यांनी गोकुळ दूध संघावर प्रशासकी येऊ नये यासाठी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. मात्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघावर येत्या मंगळवारी प्रशासक येणार हे निश्चित झाले आहे. मंत्री मुश्रीफ हे अदृश्य शक्तीपुढे अयशस्वी झाले असले तरी आता या अदृश्य शक्तीचे पुढचे टार्गेट गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे हेच आहेत. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या ईडी चौकशीच्या इशाऱ्यानंतर हे अधिक स्पष्ट झाले आहे.
‘गोकुळ’मध्ये मंत्री हसन मुश्रीफ सोडून कोणीही चालतील. गोकुळमधील ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळेंसह सर्वांची ईडी चौकशी होणार आहे. पाटील यांच्या चालकाचे आणि पियाची चौकशी लावली जाणार आहे. तर डोंगळे यांनी ईडी चौकशीच्या भीतीने अफरातफर केली आहे. मागील निवडणुका महायुती म्हणून आम्ही लढलो आहे. तेथेही त्यांनी कुरघोड्या केल्या आहेत. त्यामुळे गोकुळचा लढा आम्ही लढणार आहे. असा इशारा आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिला.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढाई झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ जागा निवडून आल्या. त्याबाबत आमदार पाटील यांना मंत्री मुश्रीफ यांच्या बद्दल असंतोष आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या बाबतचा संताप समजू शकतो. पण गोकुळ मधील माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांच्याबाबत आमदार शिवाजीराव पाटील यांना इतका संताप का? अशा चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मागेही अदृश्य शक्तीचा हात आहे का? अशी शंका आता सभासदांमध्ये निर्माण होतं आहे. मागील निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांनी महाडिक गटाच्या विरोधात भूमिका घेतली होती. तर महाडिक गटाची साथ सोडून माजी अध्यक्ष विश्वास पाटील व डोंगळे यांनी मंत्री मुश्रीफ व सतेज पाटील यांना साथ दिली होती. त्याची सल अजूनही महाडिक गटात आहे. हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या जिल्हा परिषदेच्या व्हायरल झालेल्या कॉल संभाषणमुळे अधिक स्पष्ट होते.
ज्या अदृश्य शक्तीने आपली राजकीय ताकद वापरून मंत्री मुश्रीफ यांच्यासारख्या महत्वकाक्षी व्यक्तीला थंड करण्याचे प्रयत्न केले. तिचं अदृश्य शक्ती आता गोकुळमधील या दोन माजी अध्यक्षाना निशाणा बनवत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात किंवा प्रशासक कार्यकाळात नेमके काय होणार? कोणाची चौकशी होणार? गोकुळमध्ये खरंच घोटाळे झालेत का? याबाबत दूध का दूध और पाणी का पाणी हे स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.