

Kolhapur Municipal Corporation News : कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता आली असली तरी स्थायी समिती सभापती, परिवहन आणि महिला बाल कल्याण समितीवर घेण्यात येणाऱ्या सदस्यांच्या संख्येत काँग्रेसच भारी ठरणार आहे. कारण सर्वाधिक 34 जागा काँग्रेसने जिंकल्या असल्याने महापालिकेतील समितीवर सदस्य म्हणून काँग्रेसच्याच नगरसेवकांची संख्या अधिक असणार आहे.
20 फेब्रुवारी रोजी महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत स्थायी समिती सभापती, परिवहन आणि महिला बालकल्याण समिती सभापतीची निवड केली जाणार आहे. या समितीवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्यांकडून सदस्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत. मात्र समितीवर देखील महायुतीकडे काठावरचे बहुमत असल्याने भाजपची सभापती निवडीत अग्निपरीक्षा असणार आहे.
स्थायी समितीवर सदस्य म्हणून जाण्यास अनेक नगरसेवक इच्छुक आहेत. स्थायी समितीवर 16 सदस्य असतात. त्यापैकी या समितीवर भाजपला 5, शिवसेनेला 3, राष्ट्रवादीला 1 जागा मिळणार आहे. तर एकट्या काँग्रेसला 7 जागा मिळणार आहेत. परिवहन समितीचे एकूण 12 सदस्य आहेत. त्यापैकी काँग्रेसला 5 , भाजपला 4, शिवसेनेला 2, तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळणार आहे. तसेच महिला व बाल कल्याण समितीवर काँग्रेसचे 4 सदस्य, भाजपचे 3 सदस्य, तर शिवसेनेचे दोन सदस्य असतील.
दरम्यान या तिन्ही समित्यांवर आपल्याच नगरसेवकांतून कोणाला सदस्य म्हणून पाठवायचं याचा सर्वस्वी अधिकार गटनेत्यांना असणार आहे. त्यामुळे 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सभेमध्ये बंद लखोट्यातून गटनेते सदस्यांची नावे महापौर रूपाराणी निकम यांच्याकडे देणार आहेत. या सभेत सदस्य निवडी झाल्या तर सभापती निवडीचा कार्यक्रम स्वतंत्ररित्या जाहीर करण्यात येणार आहे.
महायुतीमध्ये अनेक घटक पक्षांना पद न मिळाल्यामुळे नगरसेवक नाराज आहेत. आशा नगरसेवकांची नाराजी या सदस्य निवडीमधून दूर केली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अनेक नूतन नगरसेवक देखील स्थायी समिती सभापतीसाठी सदस्य होण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसकडे अधिक संख्या असल्याने कोणाला समितीवर सदस्य म्हणून पाठवायचे याची कसरत नेत्यांना करावी लागणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता आल्यानंतर पहिले महापौरपद भाजपने घेतले. तर उपमहापौरपद शिवसेनेच्या कोट्यातून जनसुराज्य शक्तीला देण्यात आले. महापौर पद घेतल्यामुळे शिवसेनेने स्थायी समिती सभापती पदाची मागणी केली आहे. मात्र भाजप देखील हे पद सोडण्यास तयार नाही. त्यामुळे स्थायी समिती सभापतीचा वाद अजूनही महायुतीमध्ये अंतर्गत धुसफुसत आहे. रविवारी होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समितीचे सदस्य अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण यांनी पक्षादेश डावलून भाजप-ताराराणी आघाडीचे सभापतिपदाचे उमेदवार आशिष ढवळे यांच्यासाठी हात वर करून उघड मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मेघा पाटील यांचा 9 विरुद्ध 7 मतांनी पराभव झाला. पिरजादे व चव्हाण यांच्या बंडखोरीमुळे ‘स्थायी’ची सत्ता दोन्ही काँग्रेसच्या ताब्यातून भाजप-ताराराणी आघाडीने खेचून घेतली. या पराभवाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.