
kolhapur, 24 March 2025: काँग्रेसचे निष्ठावंत दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने करवीर तालुका ढवळून निघाला आहे. करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये असलेली भाजपची ताकद वाढवण्यासाठी भाजपकडून मास्टर प्लॅन खेळात जात आहे की काय? हे या चर्चे निमित्ताने स्पष्ट होत आहे.
महायुती मधील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील घेण्यापेक्षा काँग्रेस सोबत निष्ठावंत असलेले नेते भाजपमध्ये ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातूनच गेली अनेक वर्ष काँग्रेस सोबत निष्ठावंत असलेल्या पाटील गटाला देखील ओढण्यासाठी भाजपची खेळी असू शकते. राहुल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास सहकारी संस्थांवर असणारी पकड, गावागावामधील असलेला निष्ठावंत गट भाजपसोबत येईल. याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काही राजकीय पुढार्यांकडून पायात साप सोडण्याचा प्रकार पाटील यांच्याबाबत सुरू आहे.
आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर राहुल पाटील यांनी काँग्रेसकडून करवीर मतदारसंघातून शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार चंद्रदीप नरके निवडणूक लढवली. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत असताना अवघ्या काही मताने राहुल पाटील यांना पराभव पत्करावा लागला.
भोगावती शिक्षण मंडळ, भोगावती सहकारी साखर कारखाना, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा बँक, सूतगिरण यासह अनेक सहकारी संस्थांमध्ये पाटील गटाचा धबधबा आहे. शिवाय भाषेमध्ये घेतल्यास त्यांना विधान परिषदेमध्ये देखील संधी मिळू शकते. सहकारी संस्थेमध्ये स्थान टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बसण्यापेक्षा सत्तेत बसण्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद म्हणून देखील राहुल पाटील यांनी स्वीकारले आहे.
पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबतची ही चर्चा काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांपर्यंतही पोहोचली आहे. मात्र, राहुल पाटील असा कोणताही निर्णय घेणार नाहीत, याचे कल्पना देखील काँग्रेसच्या वरिष्ठ मंडळींना आहे. मात्र पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपात गेले तर त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते देखील भाजपमध्ये जातील का? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या तरी राहुल पाटील यांच्याबाबत एक एप्रिल रोजी पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. राहुल पाटील यांनी याचे खंडन केले आहे.
"गेल्या तीन-चार दिवसांपासून काही कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. एक एप्रिलला तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहात का? अशी विचारणाही कार्यकर्ते करत आहेत. मात्र, एक एप्रिलला कोणीतरी माझे ‘एप्रिल फुल’ करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. मी काँग्रेसमध्येच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अफवांवर आणि चर्चेवर विश्वास ठेवून संभ्रमात राहू नये," असे राहुल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.