Kolhapur News, 14 Sep : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील राजकारण हे गटातटावर अवलंबून आहे. ज्याचा गट भक्कम त्याची राजकीय तटबंदी भक्कम. कार्यकर्त्यांची तटबंदी तोडली तर नेत्याची खुर्ची डळमळीत होते हे निश्चित.
मात्र, याच कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधी जिल्हा नियोजन समिती, सहकारातील संस्था, यास अनेक विविध मंडळावर त्याची निवड करून त्यांचा राजकीय उदरनिर्वाह चालू ठेवतो.
मात्र, अलीकडच्या काळात विधानसभा निवडणुकीचे गणित बिघडल्याचे दिसताच इतर पक्षातील आयत्यांना संधी देऊन कार्यकर्त्यांना भावनिक ठेवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार वाढला आहे. स्वतःच्या राजकारणासाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थेचा वापर कसा केला जातो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर स्वतःच्या तालुक्यात अजून एक संचालक पद देऊन एकाच तालुक्यात चार संचालक पदांची भरती करणे होय.
इतकेच नव्हे तर स्वतःच्या कार्यकर्त्याला बाजूला ठेवून इतर पक्षातील आयतोबांना संधी देणे म्हणजे कार्यकर्त्यांच्या पोटावरच पाय म्हणावा लागेल. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील राजकारणाचा पाया असणाऱ्या आणि सहकाराचा कणा असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा दूध संघ, सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, दूध संस्थेत राजकारणाचे गणित केलं जातं. विधानसभा-लोकसभा निवडणुकीत त्याची बेरीज होते.
या सर्व संस्थांमध्ये प्रामुख्याने पाहायला गेले तर विधानसभा लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असणारे या ठिकाणी मात्र गळ्यात गळे घालून सहकाराचा गाडा हाकताना दिसतात. मात्र वर्षानुवर्षे कार्यकर्त्यांची फरपट अशीच राहते. गेले दोन ते तीन वर्ष याच बँकेत संचालकपदाची निवड टाळली होती. मात्र, आता विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून संचालकपदाची निवड करण्यात येणार आहे.
त्यामुळे सोयीच्या राजकारणाला ऊत येणार आहे. सहकारातील नेत्यांवर लोकांनी विश्वास कोणत्या मुद्द्यांवर ठेवायचा? हेच आता सभासदांना कळत नाही. कार्यकर्त्यांना संधी देण्यापेक्षा आपले बेरजेचे राजकारण सहकारातून कसे साधता येईल याकडे नेत्यांचे लक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्ते कार्यकर्तेच राहत आहेत. नेते मात्र आपल्या सोयीची भूमिका घेत आहेत.
गेल्या अनेक वर्ष नेत्यांच्या मागे फिरून नेत्याला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत नेण्यात कार्यकर्त्यांचा हात आहे. अशा कार्यकर्त्यांना जागोजागी संधी देत त्यांच्या पोटापाण्यासाठी जोडणी लावून देणे हाच नेत्यांचा प्रमुख हेतू असला पाहिजे. मात्र, वर्षानुवर्ष तेच चेहरे, आणि निवडणुकीच्या तोंडावर इतरांचे फायदे हेच चालत आल्याने कार्यकर्त्यांनी आता नेमका संयम ठेवावा की अस्तित्व निर्माण करायचं त्याचा विचार करणे गरजेचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.