
Kolhapur News, 13 Aug : जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रारूप आराखड्यावर जिल्ह्यातून 132 हरकती घेतल्या होत्या. यापैकी कागल तालुक्यातील 5 आणि चंदगडमधील 3 अशा एकूण आठ हकरतींवर दुरुस्त्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तर करवीर तालुक्यातील 39 सह उर्वरित 124 हरकती विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी फेटाळल्या आहेत. 22 ऑगस्टला अंतिम प्रभाग आराखडा जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, ज्यांच्या हरकती फेटाळल्या आहेत, त्यांना न्यायालयात दाद मागता येणार आहे.
कागल तालुक्यात म्हाकवे, पिंपळगाव बुद्रुक, हळदवडे व जैन्याळ या गावांतून हरकती दाखल केल्या होत्या. यापैकी म्हाकवे, पिंपळगाव बुद्रुक या गावच्या हरकती मान्य करून हळदवडे व जैन्याळ या गावांच्या हरकती फेटाळल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील प्रारूप प्रभाग मतदारसंघाची फेररचना करण्यात आली.
म्हाकवे गावाने घेतलेल्या हरकतीमध्ये आपले गाव लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून सिद्धनेर्ली गटातून वगळण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य होऊन म्हाकवे गावाचा समावेश नव्याने करण्यात आलेल्या बानगे जिल्हा परिषद मतदार गटात करण्यात आला व बानगे जिल्हा परिषद मतदारसंघाचे नाव बानगे वगळून म्हाकवे केले आहे.
या बदलामुळे पंचायत समिती म्हाकवे गणाचे नाव ‘साके’ केले आहे. म्हाकवे गाव जिल्हा परिषद मतदारसंघातून वगळण्यात आल्यानंतर बानगे जिल्हा परिषद मतदारसंघातील पिंपळगाव बुद्रुक हे गाव व कसबा सांगाव जिल्हा परिषद गटातील शंकरवाडी हे गाव सिद्धनेर्ली जिल्हा परिषद गटात समाविष्ट केले आहे.
हळदवडे या गावाने पंचायत समिती कापशी गणातून चिखली जिल्हा परिषद गटातील हळदी गणामध्ये समावेश करावा, अशी मागणी केली होती; परंतु ही मागणी फेटाळली असून जैन्याळ गावानेही चिखली गटातून आपली कापशी गटामध्ये समाविष्ट करण्याची मागणी फेटाळण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या पाडळी खुर्द, शिंगणापूर, निगवे खालसा, सडोली खालसा यासह इतर प्रभागांमधील गावांमध्ये संलग्नता नाही. नद्यांचा प्रवाह जातो. त्यामुळे पुरादरम्यान एकमेकांशी संपर्क राहण्यास अडचण येते. याशिवाय, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातही अनेक गावांमध्ये संबंध किंवा संपर्क नसतानाही प्रभाग रचनेत घेतलेल्या गावांमध्ये बदल करावा, अशी हरकत घेतली होती. मात्र, या सर्व हरकती फेटाळल्या आहेत.
तर कागल तालुक्यातील पाच आणि चंदगडमधील तीन अशा एकूण आठ हरकतींनुसार प्रभाग रचनेत बदल केला जाणार आहे. दरम्यान, सोमवार (ता. 18) पर्यंत मंजूर केलेल्या हरकतींवर बदल केला जाणार आहे. त्या-त्या हरकतदारांचे मत जाणून घेऊन हे बदल केले जातील. तशी माहितीही संबंधित हकरतदारांना दिली आहे.
मंजूर हरकतींवर केलेल्या बदलासह पुन्हा हा आराखडा विभागीय आयुक्तांना पाठवला जाणार आहे. 22 ऑगस्टला पुन्हा हा आरखडा प्रसिध्द केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचना आराखड्यात अनेक चुका आहेत. त्याची फेररचना करावी लागणार आहे. या फेररचनेबाबत हरकती घेतल्या होत्या. मात्र, या हरकती फेटाळल्या असल्याने फेररचना करण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषद गटाबाबत विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे दहा जणांनी हरकती दाखल केल्या होत्या. त्या हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट राहणार आहेत. तालुक्यात तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गण होते. नव्या पुनर्रचेनेत एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण रद्द झाले आहेत.
विविध राजकीय पक्ष संघटनाचे पदाधिकारी व तालुक्यातील जनतेत नाराजीची भावना आहे. दरम्यान, याबाबत विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. त्या आयुक्तांनी फेटाळल्या आहेत. शासनाकडून 12 जून 2025 आदेशानुसार आजरा तालुक्याकरिता दोन गट चार गण निश्चित करण्यात आले आहे.
तालुक्यात भौगोलिक संलग्नता, दिशा निश्चिती व लोकसंख्येचे प्रमाणात विचारात घेऊन प्रभाग रचना करण्यात आलेली आहे. आजरा तालुक्यासाठी हरकतदारांनी अर्जात नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषद दोन गट व चार गणांची संख्या बदल करण्याचा अधिकारी या कार्यालयाकडे नाही. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याने त्यांची हरकत अमान्य करण्यात आल्याचे विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.