
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीमधून महाविकास आघाडीत गेलेले माजी आमदार के. पी. पाटील यांनी नुकताच युतीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. राष्ट्रवादीतील नेत्यांच्या सल्ल्यानुसारच आपण पक्ष सोडला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केल्याने राष्ट्रवादीतच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत त्यांनी हे विधान केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करत असताना पाटील यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांच्या सल्ल्यानुसार आपण ठाकरे गटात गेलो होतो, असा खुलासा केला आहे.
पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी नुकताच पुन्हा महायुतीतील राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे. बैठकीत मानसिंगराव यांना उद्देशून बोलताना पाटील म्हणाले, दादा सत्तेच्या विरोधात राहिले तर मला खूप त्रास झाला. माझी अडचण झाली. मी या पक्षाला कधीच सोडून गेलो नव्हतो. अडचण झाली म्हणून नेत्यांच्या सल्ल्यानुसारच मी मागच्या दाराने फिरून पुन्हा पक्षात आलो, असा खुलासा पाटील यांनी केला आहे.
महायुतीचे काय होणार माहिती नाही, पण आपण स्वबळावर निवडणूक लढवण्याची गरज आहे. ज्यावेळी नेते आदेश देतील, त्यानुसार पुढे जाऊयात, आदेशाच्या बाहेर जायचं नाही. मी काल दुसऱ्या पक्षात जाऊन विधानसभा लढवली, म्हणजे मी त्यांना सोडून गेलो असे नाही. त्यांच्या सूचनेनुसारच मी गेलो, मी गेलो म्हणजे एकटा गेलो. माजी जनता, कार्यकर्ते हे सर्व मुश्रीफ यांच्यासोबतच होते आणि कायम राहतील, असेही के. पी. पाटील म्हणाले.
माझी ताकद आहे. सहा वेळा निवडणूक लढवली. एकदा निवडणूक लढवली की लोक घाईला येतात. सरासरी ९० हजारांची मते मला आहेत, त्याला ताकद देण्याची जबाबदारी माझी आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांचे काम दिमाखदार आहे. दुसरीकडे मुश्रीफांचे काम दणक्यात आहे. हे दोघेही माझ्या पाठीमागे ठाम आहेत. मुंबईत एक आई आणि कोल्हापुरात एक आई आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. शड्डू ठोकून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरा, असे आवाहन पाटील यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.