Koregaon News : कृष्णा नदीतून पावसाळ्यातील चार महिन्यांत म्हणजेच जून ते सप्टेंबर या कालावधीत पुराचे अतिरिक्त पाणी वाहून जाते. ते पाणी जिहे - कठापूर येथे कृष्णा नदीवर बंधारा बांधून तीन टप्यांमध्ये उचलून खटाव व माण तालुक्यात देण्याचे नियोजन आहे. इतर वेळी कृष्णा नदीचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत चालू ठेवायचा, असा शासन निर्णय असूनही त्याचे पालन न केल्याने साताऱ्यातील चार अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे (पुणे) कार्यकारी अभियंता मी. दे. कुलकर्णी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे (कृष्णानगर-सातारा) अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेचे (सातारा) कार्यकारी अभियंता अमोल निकम यांच्यावर खासगी फौजदारी दाखल करावी, अशी मागणी केली आहे.
याबाबतची तक्रार धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या नऊ पदाधिकाऱ्यांनी सातारचे पोलिस अधीक्षक, कोरेगावचे पोलिस उपअधीक्षक, कोरेगाव आणि रहिमतपूर पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदारांकडे केली आहे. पाणी बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, कृष्णा नदीवर जिहे व कठापूर गावच्या हद्दीमध्ये बंधारा बांधून पाणी अडविले आहे.
मूळ योजनेनुसार या ठिकाणाहून पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या कालावधीत कृष्णा नदीतून पाणी उचलून ते नेर, आंधळी तलावात व त्याखालील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये नेण्याचे नियोजन आहे. तसेच हा विहित कालावधी वगळता वर्षातील इतर महिन्यांत कृष्णा नदीचा नैसर्गिक नदी प्रवाह सुरळीत चालू ठेवायचा आहे. तो अडवण्याचा अथवा बंद करावयाचा नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे कृष्णा नदीचे पाणी जिहे - कठापूर योजनेच्या बंधाऱ्यापासून खाली सोडणे बंद केले आहे. तसेच ही योजना पावसाळ्यातील चार महिन्यांची असूनसुद्धा राजकीय दबावापोटी बेकायदेशीरपणे चालू ठेवलेली आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे (पुणे) कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी बेकायदेशीर पत्र पाठवून कण्हेर धरणातील पाणी उपलब्ध करून आंधळी धरण 50 टक्के भरण्याच्या उद्देशाने योजना पुन्हा कार्यान्वित केलेली असून, ती आजअखेर सुरूच आहे.
या चार अधिकाऱ्यांनी डी. पी. आर. तरतुदींचा भंग केला आहे. तसेच बेकायदेशीरपणे कृष्णा नदीचे पाणी अडविलेले आहे. त्यांचे हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने त्यांच्यावर भारतीय दंड विधान 166 व 409 अन्वये खासगी फौजदारी दाखल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या या कृत्यामुळे कृष्णा नदीवरील क्षेत्रातील सातारा, कोरेगाव, कराड तालुक्यांतील शेतकऱ्यांना पाणी कमी पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या तक्रारीवर पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बर्गे, कार्याध्यक्ष रणजित फाळके, नंदकुमार माने - पाटील, अविनाश माने, पृथ्वीराज माने, माणिकराव भोसले, जगदिश पवार, महादेव भोसले, पृथ्वीराज बर्गे यांच्या सह्या आहेत.
(Edited by Amol Sutar)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.