

विठ्ठल परिवारातील सर्व नेते मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पुढाकाराने एकत्र आले, पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीने स्थानिक राजकारणात मोठी कलाटणी दिली आहे.
अभिजित पाटील, कल्याणराव काळे, भगीरथ भालके आणि गणेश पाटील हे विठ्ठल परिवारातील प्रमुख नेते या बैठकीत एकत्र आले, ज्यामुळे जुन्या मतभेदांवर पडदा पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विठ्ठल परिवाराच्या एकत्रीकरणामुळे पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक अधिक रंगतदार होणार असून, या मनोमिलनाने महाविकास आघाडीला बळकटी मिळण्याचे संकेत आहेत.
Solapur, 08 November (सूर्यकांत बनकर) : पंढरपूरच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना शुक्रवारी घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली विठ्ठल परिवारातील सर्व नेत्यांच्या मनोमिलनाची दुसरी बैठक करकंब येथील हॉटेल ग्रँडमध्ये पार पडली. पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी परिचारक गटाला रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपनेते दिलीप धोत्रे यांनी विठ्ठल परिवारातील सर्व नेत्यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला. पंढरपूर, माढ्याच्या राजकारणात विखुरलेला विठ्ठल परिवार धोत्रे यांच्या माध्यमातून एकत्रित येण्याची चिन्हे दिसत आहेत.
पंढरपूरच्या राजकारणाची दिशा ठरविणारा म्हणून विठ्ठल परिवाराकडे (Vitthal Parivar) पाहिले जाते. मात्र, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून विठ्ठल परिवारात फूट पडली होती. कारखाना ते आमदारकी जिंकल्यापासून अभिजीत पाटील यांनी आपणच विठ्ठल परिवाराचे नेते असल्याचे सांगायला सुरुवात केली होती, त्यामुळे परिवारातील इतर नेते त्यांच्यापासून चार हात लांब होते. मात्र, नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येण्याची भाषा सुरू झाली होती.
मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पुढाकारातून झालेल्या या बैठकीला आमदार अभिजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, भगीरथ भालके, कल्याणराव काळे, अनिल सावंत, गणेश पाटील, महेश साठे आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे पंढरपूर (Pandharpur) नगरपरिषद आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पहिल्यांदाच विठ्ठल परिवारातील नेते एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले.
भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवाराच्या नेतृत्वावरून टोकाचे मतभेद निर्माण झाले होते. त्यातच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आणि त्या पाठोपाठ विधानसभेचीही निवडणूक जिंकल्यानंतर अभिजित पाटील यांनी आपणच विठ्ठल परिवाराचे नेते असल्याचे अनेक व्यासपीठावरून सांगितले होते. पण ते इतरांना रुचत नव्हते. त्यातच विधानसभेच्या रणधुमाळीत गणेश पाटील यांनी अभिजित पाटील यांना टोकाचा विरोध केला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर रोजी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीच्या नेत्यांची पहिली बैठक करकंबमधील हॉटेल ग्रँडमध्ये झाली होती. त्या बैठकीला कल्याणराव काळे आणि गणेश पाटील उपस्थित नव्हते. त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकजुटीने लढण्याचा निर्धार केला होता.
नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरच्या बैठकीस विठ्ठल परिवारातील सर्व नेते एकत्रित आले होते. त्यामुळे पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पार पडलेल्या या बैठकीत अभिजित पाटील, कल्याणराव काळे, भगीरथ भालके आणि गणेश पाटील या विठ्ठल परिवारातील नेत्यांमधील राजकीय दरी कमी झाली की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या बैठकीने पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत आहेत, हे मात्र नक्की!
कल्याणराव काळेंच्या कार्यालयातही झाली बैठक
कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयातही आमदार अभिजित पाटील, भगीरथ भालके, ॲड. गणेश पाटील या विठ्ठल परिवारातील प्रमुख नेत्यांसह मनसे नेते दिलीप धोत्रे, शिवसेनेचे महेश साठे, भारत कोळेकर, शहाजी साळुंखे, संदीप पाटील आदी नेते मंडळी एकत्रित आली होती. त्यामुळे विठ्ठल परिवाराच्या मनोमिलनाची चर्चा आणखी बळकट झाली. या सर्वांचे मनोमिलन पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.
Q1. विठ्ठल परिवारातील नेत्यांच्या मनोमिलनाचा पुढाकार कोणी घेतला?
A1. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी हा पुढाकार घेतला.
Q2. या बैठकीत कोणते प्रमुख नेते उपस्थित होते?
A2. अभिजित पाटील, कल्याणराव काळे, भगीरथ भालके, गणेश पाटील आणि वसंतराव देशमुख उपस्थित होते.
Q3. ही बैठक कुठे पार पडली?
A3. करकंब येथील हॉटेल ग्रँडमध्ये ही बैठक झाली.
Q4. या बैठकीचा पंढरपूरच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
A4. या मनोमिलनामुळे पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत रंगतदार आणि स्पर्धात्मक होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.