
Kolhapur News : जनसुराज्य शक्तीचे संस्थापक-अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, हातकणंगलेचे आमदार डॉ. अशोकराव माने यांची उमेदवारीवरून कसरत होण्याची शक्यता आहे. पन्हाळा शाहूवाडी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाच्या वेशीवर असणाऱ्या घुणकी मतदारसंघात महायुतीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामुळं उमेदवारी देताना आमदारांची डोकेदुखी वाढणार आहे.
काँग्रेसचे माजी आमदार राजू आवळे, स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार डॉ. सुजितकुमार मिणचेकर यांच्यासह शिवसेना ठाकरे गट, शेतकरी संघटनासंह विविध संघटनाही कार्यरत आहेत. पण 2017 सह बहुतांशवेळा जनसुराज्य शक्ती पक्षाने हा मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे.
गतवेळच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने नवख्या पुष्पाताई आळतेकर यांना उमेदवारी देऊनही त्या विजयी झाल्या. यामुळे यावेळीही जनसुराज्य शक्ती पक्षातून उमेदवारी मिळण्यासाठी भाऊगर्दी होणार हे निश्चित आहे. घुणकी जिल्हा परिषद गट ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाला आहे. या मतदारसंघात घुणकी व नवे पारगाव पंचायत समिती गण असून, घुणकी खुला महिला, तर तळसंदेत खुला प्रवर्ग आहे.
२०१७ ला अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असल्याने यावेळी खुला होईल, या अपेक्षेवर असलेल्या इच्छुकांच्या पदरी निराशा आली. मात्र जे इच्छुक आहेत, त्यांच्या आई, पत्नींचे ओबीसी दाखले काढले आहेत, त्यांची 'दुधाची ताकावर तहान भागणार' असूनही ते खूश आहेत. त्यामुळे मातब्बरांच्या आई किंवा सौभाग्यवतींचे चेहरे समोर येणार आहेत. या मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होण्याची शक्यता आहे.
घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघ हा वारणा काठावरील गावांचा आहे. या मतदारसंघात किणी, घुणकी, चावरे, तळसंदे, नवे पारगाव, जुने पारगाव, निलेवाडी या गावांचा समावेश आहे. वारणा नदीमुळेही गावे सधन असून, संवेदनशीलही आहेत. या मतदारसंघातील गावांतील अंतर कमी असल्याने प्रचार करण्यास कमी वेळ लागतो. नेहमीच संपर्क असल्याने कार्यक्रमांना या गावातील प्रमुखांना निमंत्रण असते. याचा लाभ निवडणुकीत इच्छुकांना होतो.
सरितादेवी हंबीरराव मोहिते, कल्याणी राजवर्धन मोहिते, सुजाता सुभाष जाधव, विद्या संभाजी पाटील, संगीता काशिलिंग सिद, (घुणकी), सुलोचना राजाराम देशमुख (नवे पारगाव), शुभांगी महेश कुंभार (तळसंदे), शारदा शिवाजी गुरव, विद्युलता नामदेव चोपडे (चावरे), सुशीला वैभव कुंभार (किणी), वेत्रवती बुड्डे, स्वाती सिद आदींची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत.
विजयापेक्षा उमेदवारीसाठीच करावे लागतात प्रयत्न
घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावात जनसुराज्य शक्तीच्या कार्यकर्त्यांचे दोनपेक्षा अनेक गट कार्यरत आहेत. निलेवाडीत दोन, जुने व नवे पारगावात तीन, तळसंदेत दोन, चावरेत दोन, घुणकीत चार, किणीत एक गट आहे. कोणत्याही निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्यासाठी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना प्रचंड प्रयत्न करावे लागतात.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक नेते संपर्क साधू लागले आहेत. माजी आमदार राजू आवळे यांनी वाठार येथील सूतगिरणीवर इच्छुकांची बैठक घेतली, तर आमदार डॉ. कोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात इच्छुकांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. या पक्षाकडून इच्छुकांची गर्दी जास्त आहे. त्यामुळे आपणाला उमेदवारी मिळण्यासाठी कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे, तर कोणाला उमेदवारी द्यायची, हा प्रश्न नेहमीप्रमाणे आमदार कोरेंच्या पुढे असणार आहे. या मतदारसंघात घुणकी, नवे व जुने पारगाव या दोन्ही गावांत मतदारांची संख्या अधिक असल्याने जिल्हा परिषदेची उमेदवारी शक्यतो या गावात दिली जाते. त्यामुळे इथले कार्यकर्ते जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करू लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.