Malshiras News : माढा लोकसभा मतदारसंघील ( Madha Lok Sabha Election 2024 ) भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( Ranjitsingh Naik Nimbalkar ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांमुळे त्यांना तिकीट मिळालं नसल्याचा दावा केला होता. याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते-पाटलांना थेट इशारा दिला आहे. "माळशिरस तालुक्याला मोहिते-पाटलांच्या दहशतीतून मुक्त करणार," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
माढा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांची सभा पार पडली. या वेळी फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) मोहिते-पाटील कुटुंबाला लक्ष्य केलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"ठोकशाही चालू दिली जाणार नाही"
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "रणजितसिंह निंबाळकर यांच्याविरोधात उभे राहिलेल्या उमेदवाराचं ( धैर्यशील मोहिते-पाटील ) प्रतिज्ञापत्र पाहा. माळशिरस तालुक्याला त्यांच्या ( मोहिते-पाटील ) दहशतीतून मुक्त करणार आहे. त्यांनी सामान्य माणसाला त्रास दिला, जमिनी बळकावल्या, लोकांचे खून आणि हल्ले केले. हे सहन केलं जाणार नाही. ही लोकशाही आहे, ठोकशाही नाही. इथे ठोकशाही चालू दिली जाणार नाही."
"50 वर्षांत घोषणा पूर्ण केल्या नाहीत"
"50 वर्षे ज्यांना नेतृत्व दिलं, ते प्रत्येक निवडणुकीत तीच-तीच भाषणं देत घोषणा करत होते. पण, त्या घोषणा कधीही पूर्ण झाल्या नाहीत," असा हल्लाबोलही फडणवीसांनी मोहिते-पाटलांवर केला आहे.
"36 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार"
"रणजितसिंह निंबाळकर यांना मोदी यांच्याबरोबर संसदेत पाठवलं. त्यामुळे माळशिरसमध्ये पाणी आणि रेल्वेदेखील आली. भविष्यात 36 गावांच्या पाण्याचा प्रश्न मोदी यांच्या माध्यमातून सोडविल्याशिवाय शांत बसणार नाही. यापूर्वी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचा मोठा गवगवा करण्यात आला. या भागातील लोकांना वारंवार पाणी देण्याचं आश्वासन देण्यात आलं. मात्र, मी मुख्यमंत्री झाल्यावर कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेची फाइल उघडली आणि तेव्हा पाणी उपलब्ध नाही, योजना करता येणार नाही, म्हणून ती फाइल बंद केली," असं फडणवीसांनी सांगितलं.
"कृष्णेचं पाणी उजनीत आणणार"
"पण, आता फ्लड इरिगेशन प्रकल्पाला जागतिक बँकेनं तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यासाठी पैसे देण्याचं जागतिक बँकेनं मान्य केलं आहे. त्यामुळे आता कृष्णा नदीतून वाहून जाणारं पुराचं पाणी उजनीत आणता येणार आहे. मोदींसारखा नेता पाठीशी असेल, तरच हे शक्य आहे," असं फडणवीसांनी म्हटलं.
रणजितसिंह नाईक-निंबाळकर काय म्हणाले होते?
"धैर्यशील माहिते-पाटलांवर 31 गुन्हे दाखल आहेत. लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाल्याचं निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात लिहिलं आहे. असा आदर्श उमेदवार शरद पवारांना सापडला. या आदर्श उमेदवाराला शरद पवार सगळीकडे घेऊन फिरत आहेत. धैर्यशील मोहिते-पाटलांना तिकीट न मिळण्याचं कारण प्रतिज्ञापत्र आहे. भाजपला सगळ्या निकषात बसणारा उमेदवार पाहिजे. एक घरात केंद्रीकरण नको पाहिजे होते," असा निशाणा रणजितसिंह निंबाळकरांनी साधला होता.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.