लोकसभा निवडणुका अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. तरी सांगलीतील भाजपमधील अंतर्गत संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर काही दिवसांपूर्वी गटबाजी उघड झाली असताना बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोरही गटबाजी उघड झाली.
रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे मिरजेतील एका नेत्याच्या घरी चहापानासाठी माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासोबत गेले होते. त्यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार संजयकाका पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भाजपमधील (BJP) संघर्ष टोकाला जात असल्याचे दिसत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांना भाजपमधील काही आमदार, माजी आमदारांनी विरोध केला होता. पक्षाने उमेदवार बदलावा, अशी मागणी प्रदेश भाजपकडे रेटली होती. मात्र त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करत ही नाराजी थोपवली होती. त्यानंतरहा संजयकाकांच्या विरोधातील वाद वाढतच गेला होता.
आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना पक्षातील वाद आणखी वाढल्याचे दिसते. लोकसभा निवडणुकीसाठी यावर्षी उमेदवार बदलण्याची मागणी जोर धरत आहे. त्यासाठी भाजपचे अनेक आजी-माजी आमदार कामाला लागले आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख (Prithviraj Deshmukh) यांनी यावर्षी उमेदवारीचा दावा केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये दोन गट सक्रिय झाले आहेत.
एकीकडे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे (Suresh Khade) हे संजयकाकांना साथ देताना दिसतात तर भाजपचे अनेक नेते काकांच्या विरोधात आहेत. ते देशमुखांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष वाढल्याचे चित्र आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सांगलीच्या दौर्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्या मार्केट यार्डातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. तेव्हा पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र देशमुख, संग्राम देशमुख यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या समोर ही गटबाजी उघड झाली होती.
हा वाद ताजा असतानाच मिरजमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचे भूमिपूजन आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. निमंत्रण पत्रिकेवर अध्यक्षस्थानी पालकमंत्री सुरेश खाडे, प्रमुख उपस्थितांमध्ये खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह मान्यवरांची नावे होती. पण पालकमंत्री खाडे आणि खासदार पाटील यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासोबत मंत्री चव्हाण मिरजेतील महायुतीमधील एका नेत्याच्या घरी चहापानसाठी गेले होते. या प्रकारामुळे नाराज झाले. यामुळे चव्हाण यांच्यासमोर भाजपमधील गटबाजी उघड झाली. लोकसभा निवडणुका तोंडावर आली असताना भाजपमधील गटबाजी कमी होताना दिसत नाही.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.